Syed Mushtaq Ali Trophy 2025 नवी दिल्ली: पंजाब आणि बडेदा यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना पार पडला. पंजाबचा कॅप्टन अभिषेक शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मानं 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं. अभिषेक शर्मानं भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची देखील धुलाई केली.  

Continues below advertisement

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मानं चार बॉलचा सामना केला. यात एका वाईड बॉलचा समावेश होता. अभिषेक शर्मानं एक चौकार आणि एक षटकार मारला. अभिषेकनं हार्दिक पांड्याच्या चार बॉलमध्ये 12 धावा काढल्या. अभिषेक शर्मानं 19 बॉलमध्ये  5 चौकार आणि 4 षटकारांसह 50 धावा केल्या. त्याचं स्ट्राईक रेट 263.16  इतकं होतं.  

हार्दिक पांड्याची धुलाई

हार्दिक पांड्या आशिया कपमध्ये दुखापत ग्रस्त झाला होता. त्यानंतर हार्दिक पांड्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कमबॅक केलं आहे. पंजाबविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला चांगली गोलंदाजी करता आली नाही. पंजाबच्या फलंदाजांनी हार्दिक पांड्याच्या चार ओव्हरमध्ये 52 धावा काढल्या. तर, पांड्याला एक विकेट मिळाली.   

Continues below advertisement

हार्दिक पांड्याकडून पंजाबची धुलाई

पंजाबनं बडोद्याविरुद्ध फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 बाद 222 धावा केल्या होत्या. अनमोलप्रीत सिंह यानं 32 बॉलमध्ये 69 धावा केल्या. तर, अभिषेक शर्माच्या 50 आणि नमन धीरच्या 39 धावांच्या जोरावर पंजाबनं 20 ओव्हरमध्ये 8 बाद 222  धावा केल्या. बडोद्याच्या संघानं या धावसंख्येचा पाठलाग 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यशस्वीपणे पूर्ण केला. हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत नाबाद 77 धावा केल्या. तर, शिवलिक शर्मानं 47 आणि विष्णू सोळंकीनं 43 धावा केल्या. हार्दिक पांड्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. 

अभिषेक शर्माचं बंगाल विरुद्ध दमदार शतक

पंजाबचा कॅप्टन अभिषेक शर्मानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बंगाल विरुद्ध 32 बॉलमध्ये शतक केलं होतं. त्यानं त्या मॅचमध्ये 52 बॉलवर 148 धावा केल्या होत्या. अभिषेकनं त्या डावात 16 षटकार आणि 8 चौकार मारले होते. 

अभिषेक फॉर्ममध्ये दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढणार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अभिषेक शर्मा दमदार फलंदाजी करतोय. 9 डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. भारताचा स्फोटक फलंदाज आणि टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेला अभिषेक शर्मा अशीच कामगिरी करत राहिल्यास आफ्रिकेचं टेन्शन वाढणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला टी 20 मालिकेत पराभूत करु शकते का ते पाहावं लागेल.