Hardik Pandya : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) संपल्यापासून, हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आतापर्यंत या फॉरमॅटमधील तीन मालिकांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. टी20 संघाचा कर्णधार म्हणून तो जबाबदारी निभावत आहे. त्याने टी20 कर्णधार म्हणून तिन्ही मालिका जिंकल्या आहेत. यादरम्यान, हार्दिकने फलंदाज आणि गोलंदाज अशा दोन्ही भूमिका सक्षमपणे निभावल्या.

  


न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत हार्दिकला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. हार्दिकने या मालिकेत 66 धावा केल्या, तर एकूण 5 विकेट्सही घेतल्या. यासोबतच हार्दिकच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे, तो T20 फॉरमॅटमध्ये 4000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. आयपीएलमधील आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान निर्माण करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात दमदार अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जात आहे. IPL 2022 च्या हंगामात कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करत हार्दिकने त्याच्या पहिल्या IPL मोसमात गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले.


पहिला T20 सामना 2013 मध्ये खेळवण्यात आला


2013 मध्ये हार्दिकने आपल्या कारकिर्दीतील पहिला टी-20 सामना मुंबईविरुद्ध अहमदाबादच्या मैदानावर खेळला होता. तेव्हापासून, त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 223 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये हार्दिकने 29.42 च्या सरासरीने 4002 धावा केल्या आहेत. हार्दिकच्या या फॉरमॅटमध्ये 15 अर्धशतकं झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 आहे. दुसरीकडे, हार्दिकच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, T20 फॉरमॅटमध्ये त्यानं आतापर्यंत 27.27 च्या सरासरीने एकूण 145 विकेट्स घेतल्या आहेत, तर एका सामन्यात 3 वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.


भारताचा दमदार मालिकाविजय


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या टी20 सामन्यात भारताने 168 धावांनी मोठा विजय मिळवत मालिकाही जिंकली आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत भारतानं 235 धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं. यावेळी भारताकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) शानदार शतक झळकावलं आहे. त्याने 63 चेंडूत 126 धावा केल्या. ज्यानंतर गोलंदाज कर्णधार हार्दिकनं 4 विकेट्स घेत इतर गोलंदाजाच्या मदतीनं न्यूझीलंडला 66 धावांत सर्वबाद करत सामना 168 धावांनी जिंकला. मालिकेतील पहिला सामना जरी भारतानं गमावला असला तरी दुसरा सामना 6 विकेट्सनी आणि आजचा सामना जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :