Team India Coach : आगामी टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय संघाचे मुख्य कोच म्हणून राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडने कार्यकाळ वाढवण्यास नकार दिलाय, त्यामुळे बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध घेतला जातोय. स्टिफन फ्लेमिंग आणि गौतम गंभीर यांची नावं चर्चेत होती. आता यामध्ये आणखी एक नाव जोडले आहे. भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह यानेही भारतीय संघाच्या हेड कोचसाठी तयारी सुरु केली आहे. त्यानं बीसीसीआयने इच्छा व्यक्त केली आहे. 


1 जुलै पासून भारतीय संघाला नवा कोच शिकवणी देणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने नव्या कोचच्या निवडीची प्रक्रिया वेगवान केली आहे. स्टिफन फ्लेमिंग, गौतम गंभीर आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांची नावं समोर आली होती. पण आता पीटीआयच्या वृत्तानुसार, भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने टीम इंडियाचा कोच बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिपोर्ट्सनुसार, हरभजन सिंह याच्या मते कोच होणं म्हणजे संघाला मॅनेज करणं होय. खेळाडूंना फलंदाजी अथवा गोलंदाजी शिकवणं नाही.


भज्जी काय म्हणाला ? 


हरभजन सिंह याच्या मते, "जर संधी मिळाली तर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परत येईल. कोचिंग म्हणजे संघाला मॅनेज करणं होय, खेळाडूंना ड्राईव्ह अथवा पूल शॉट शिकवणं नाही. " हरभजन पुढे म्हणाला की, खेळाडूंना पहिल्यापासूनच सर्व काही येत. एक चांगला कोच होणं म्हणजे त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन करणं होय. 


नवा कोच कधीपर्यंत राहणार ?


गेल्या आठवड्यात बीसीसीआयने सोशल मीडियावर नव्या कोचसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं सांगितले होते. नव्या कोचचा कालावधी एक जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. म्हणजे,  नव्या कोचला 2027 वनडे विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार करण्याची जबाबदारी असेल. टीम इंडियाच्या कोच पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 27 मे 2024 आहे. 






राहुल द्रविडचा नकार - 


दरम्यान, 2023 वनडे विश्वचषकात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर राहुल द्रविड यान कोचिंग सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण बीसीसीआयच्या विनंतीनंतर त्याचा कार्यकाळ वाढवण्यात आला. आता 29 जून रोजी राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविड याने आणखी कार्यकाळ वाढवण्यास नकार दिलाय. त्यामुले बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध घेतला जातोय. बीसीसीआयकडून गौतम गंभीर आणि स्टिफन फ्लेमिंग यांना अप्रोच करण्यात आलेय. रिकी पाँटिंग याचेही नाव चर्चेत आहे. आता त्यात हरभजन सिंह यानेही इच्छा व्यक्त केली आहे. 27 तारखेपर्यंत किती अर्ज येतात, याकडेही चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.