पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज 39 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झारखंडच्या (तेव्हा बिहार) रांचीमध्ये झाला होता. क्रिकेटपटूंपासून चाहते धोनीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यातच भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने बर्थ डे गिफ्ट म्हणून धोनीला खास पत्र लिहिलं आहे. क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं केदार जाधवने पत्रात म्हटलं आहे. त्याने हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.
केदार आणि धोनी यांची चांगली मैत्री आहे. केदार जाधवने वेळोवेळी धोनीचं कौतुक केलं आहे, त्याचे आभारही मानले आहेत. त्यामुळेच आज धोनीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत केदारने त्याच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. या पत्राद्वारे केदारने त्याची क्रिकेट कारकीर्द घडताना धोनीने दिलेली शिकवण आणि धोनीसोबतचं नाते कसं तयार झालं, कसं घट्ट होत गेलं याबाबतही सांगितलं आहे.
Happy Birthday MS Dhoni : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीचे 11 विक्रम
प्रिय माही भाई,
सुमद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की मला कायम तुमची आठवण येते. लाईटहाऊस दिशा दाखवण्याचं काम करतं, दिशा दाखवताना उजेड देतं आणि लाटाही झेलतं, तुमच्यासारखंच! तुम्हीही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलल्या पण खंबीरपणे उभे राहिलात. लाईटहाऊस सारखंच!
दरवर्षी आपण एकमेकांना वाढदिवसाला सोबत असतो, यावेळी लॉकडाऊनमुळे साधी भेटही झाली नाही. मी टीव्हीवर जुन्या मॅचेस पाहताना माझी जर्नी रीकॉल करत होतो. आपल्या पार्टनरशिप्स, स्टम्पमागून तुम्ही दिलेल्या टिप्स, ऑफ द फिल्ड किस्से... सगळंच डोळ्यांसमोरुन जात होतं. तेव्हाच डोक्यात आलं की, तुमच्या येणाऱ्या बर्थडेला काहीतरी मस्त गिफ्ट द्यावं. देशाला 2 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट रँकिंगमध्ये पहिली पोझिशन मिळवून देणाऱ्या कॅप्टनला मी गिफ्ट म्हणून तरी काय देणार? काहीच सुचलं नाही तेव्हा डोक्यात आलं तुम्हाला पत्र लिहावं. माझ्यासकट तुमच्या अगणित चाहत्यांच्या मनात काय आहे हे सांगावं...!
तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहण्यापासून सोबत खेळण्यापर्यंतचा प्रवास कदाचित नीटसा आठवणार नाही मला; पण एक प्रवास मात्र माझ्या मनावर कोरला गेलाय. 2017 मध्ये एका मॅचनंतर आपण ट्रॅव्हल करत होतो. मी फ्लाईटमध्ये तुमच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. दमल्यामुळे मला लगेच झोप लागली, मी जेवणही तसंच ठेवलं. जाग आली तेव्हा माझ्यासमोर आणखी एकाचं जेवण होतं. मी तुम्हाला विचारलं, "हे कोणाचं आहे?" तुम्ही म्हणालात, "मेरा ही है. अच्छा हुआ तेरी निंद खुल गयी. मैं तेरे ही लिए रुका था, साथ मे खायेंगे." त्या एका क्षणात माझ्या आयुष्यातली मोठ्या भावाची कमी भरुन निघाली. आजही ते क्षण आठवताना मी एक गाणं नेहमी गुणगुणतो, मेरी जिंदगी सवारी....
देशातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी तुम्ही असे अनेक रोल निभावता. कुणाचा मित्र, मेंटॉर, आयडॉल तर कित्येकांचा Thala. इंडियाच्या जर्सीत तुम्ही ग्राऊंडवर उभे असता तेव्हा तुमच्याबद्दल काय वाटतं हे लिहिता, सांगता तरी येईल; पण तुम्हाला इंडियन आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये पाहून काय वाटतं हे आमच्या डोळ्यातला अभिमानच सांगू शकेल.
तुम्ही सांगितलेली एक गोष्ट कायम लक्षात असते माझ्या, "केदार, लास्ट बॉल तक उम्मीद नहीं हारनी चाहिए. कोई भी टार्गेट इम्पॉसिबल नहीं होता. खुद पे भरोसो रखके कोशिश करते रहो. ग्राऊंड पे भी और जिंदगी में भी." हेच तुम्ही अनेकवेळा करुनही दाखवलंत. सामना हरल्यानंतरही चेहऱ्यावरचं हसू असेल किंवा जिंकल्यावर ट्रॉफी यंगस्टर्सच्या हातात देऊन कोपऱ्यात उभं राहणं. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही आम्हाला "लाईफ लेसन्स" दिले; पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काम तुम्ही केलंत, ते म्हणजे प्लेअर्सला सपोर्ट करणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि टीम घडवणं. मुलीच्या जन्मानंतर तिला बघायला न जाता "I am on national duty so I think everything else can wait" म्हणणारा तुमच्यातला कॅप्टन आणि आयपीएल जिंकल्यावर फोटोसेशनऐवजी मुलीसोबत खेळणार तुमच्यातला बाप, ही दोन्ही रुपं आम्ही पाहिली. कसं खेळायचं हे शिकवतानाच कसं जगायचं, हेही शिकवलंत.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा हाहाकार, जवळच्या वाटणाऱ्या सेलिब्रिटींचं जाणं यामुळे देशात थोडा उदासीचा नूर आहे. सगळं काही सुरळीत होईल याची खात्री आहेच; पण असं वाटतं की लोकांच्या चेहऱ्यांवर पुन्हा आनंद येण्यासाठी काहीतरी भारी घडलं पाहिजे. जे पाहायला दु:ख, काळजी विसरुन सगळा देश एकत्र यईल. तेव्हाच डोक्यात आलं, तुम्ही पुन्हा स्टान्स घेतलात तर हे सगळं घडेलच की...
माही भाई, गेली 15 वर्षे तुम्हाला खेळताना पाहिलंय तरी अजूनही आमचं मन भरलं नाहीय. माझ्यासकट सगळ्या देशाला तुम्हाला पुन्हा एकदा खेळताना पाहायचंय. तुम्ही क्रीझवर उभे राहाल आणि 'माही मार रहा है' म्हणत सगळा देश जल्लोष करेल. तुम्ही नेहमीसारखी झोकात मॅच फिनिश करुन शांतपणे पॅव्हेलियनकडे याल. आम्ही भरल्या डोळ्यांनी हेल्मेटमधला तुमचा हसरा चेहरा डोळ्यांत साठवू आणि सगळ्यांच्या मनात तेव्हा एकच गाणं वाजत असेल....
अभी ना जाओ छोडकर...
के दिल अभी भरा नही...
के दिल अभी भरा नही...
तुमचा मित्र आणि टीममेट
केदार जाधव