Glenn Maxwell Record: ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारली. त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आणि केवळ एका पायावर साऱ्या शरीराचा तोल पेलून 128 चेंडूंत नाबाद 201 धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या या खेळीला 21 चौकार आणि 10 षटकारांचा साज होता. त्याच्या याच खेळीनं ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात एक रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 19व्या षटकात सात बाद 91 अशी दाणादाण उडाली होती. त्या परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी धरून ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात कमिन्सचा वाटा 68 चेंडूंत नाबाद 12 धावांचा होता. मॅक्सवेल याने दुखापतग्रस्त असतानाही अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला. मॅक्सवेल याने ऐतिहासिक द्विशतक ठोकत अफागणिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
ऑस्ट्रेलियाची अवस्था दैयनीय झाली तेव्हा ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्यात त्याला क्रॅम्प आले. त्यामुळे वारंवार त्रास होत होता. खेळपट्टीवर नीट उभेही राहता येत नव्हते. पण मॅक्सवेलने जिद्द सोडली नाही. फटका मारताना एका पायावर तोल संभाळत त्याने चौकार आणि षटकार मारले. मॅक्सवेल याने चौफेर फटकेबाजी करत एकाहती सामना जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज अफगाण अक्रमणासमोर नांगी टाकली, पण ग्लेन मॅक्सवेल याने एकट्याने लढा दिला. दुखापत झाली असतानाही ग्लेन मॅक्सवेल याने मैदान सोडले नाही. मॅक्सवेलला धावताही येत नव्हते. पण त्याने जिद्द सोडली नाही, त्याने लढा दिला. डेविड वॉर्नर 18, टेव्हिस हेड 0, मिचेल मार्श 24, मार्नस लाबुशेन 14, जोश इंग्लिंश 0, मार्कस स्टॉयनिस 6 आणि मिचेल स्टार्क 3 धावांवर बाद झाले. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलिया अधीच अडचणीत आला होता, त्यात मॅक्सवेलला दुखापत झाली होती. पण एकाच जागेवर उभं राहून मॅक्सवेल याने टोलेबाजी केली. मॅक्सवेल याने जिद्द न सोडता मैदानावरच तळ ठोकला. मॅक्सवेलच्या या झंझावती द्विशतकाचे सर्वजण कौतुक करत आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा थाप पडत आहे. मॅक्सवेलसारखी खेळी आजपर्यंत विश्वचषकात कधीही पाहिली नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांची आहे.
मॅक्सवेलचे वादळी द्विशतक -
ग्लेन मॅक्सवेल याने षटकार मारत द्विशतक ठोकले. त्याने 128 चेंडूत नाबाद 201 धावा केल्या आहेत. मॅक्सवेल याने आपल्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकार ठोकले. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने 170 चेंडूत नाबाद 202 धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान 179 धावांचे आहे.