India VS England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढत आहे. ही मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली या मालिकेत खेळणार आहे आणि सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. पण, बऱ्याच काळानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे कसोटी मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे भारताच्या कसोटी संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने काही नव्या चेहऱ्यांचे स्वागत करत आणि अनुभवी खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे.
गंभीर यांनी कसोटी संघात प्रथमच स्थान मिळवलेल्या अर्शदीप सिंग आणि साई सुदर्शनचं मनःपूर्वक स्वागत केलं आहे. दोघांनीही अलीकडील फॉर्मने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते, आणि आता त्यांना कसोटी रंगमंचावर आपली छाप पाडण्याची संधी मिळाली आहे.
पुनरागमन कधीच सोपे नसते, पण....
तसेच, कसोटी क्रिकेटमधून काही काळ दूर असलेला करुण नायर पुन्हा संघात परतला असून, त्याच्या पुनरागमनाबद्दलही गंभीर यांनी आनंद व्यक्त केला आहे. करुण नायरचा अनुभव आणि संयम कसोटी संघासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "पुनरागमन कधीच सोपे नसते, कधीही हार न मानण्याची वृत्ती, हे संपूर्ण संघासाठी प्रेरणादायी आहे, असे गंभीरने बीसीसीआय टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
याशिवाय, संघाच्या नेतृत्वाची सूत्र युवा फलंदाज शुभमन गिल आणि उपकर्णधार यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्याकडे देण्यात आली असून, या नव्या जबाबदाऱ्यांबद्दल गंभीर यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. "भारताचं नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, आणि मला खात्री आहे की शुभमन आणि पंत दोघंही संघाला पुढे घेऊन जाण्यात यशस्वी ठरतील," असे गंभीर म्हणाला.
गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कसोटी संघ नव्या जोमाने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे, आणि चाहत्यांमध्येही या नव्या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
कर्णधार : शुभमन गिल
उपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंत
फलंदाज : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी
ऑलराउंडर : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
विकेटकीपर : ध्रुव जुरेल
हे ही वाचा -