Gautam Gambhir On World Cup 2011 : विश्वचषकाला काही दिवस शिल्लक आहेत, त्यापूर्वीच माजी क्रिकेटपटूंची वक्तव्ये चर्चेत येत आहेत. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाचा दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जातेय. २०११ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले होते. या विश्वचषकात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीर याचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय आहे. २०११ विश्वचषकाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, 2011 च्या विश्वचषक विजयाचे क्रेडिट सर्व खेळाडूंना मिळाले नाही. फक्त धोनीने मारल्याला विजयी षटकाराचीच चर्चा होते. तुम्ही भारतीय संघाला विसरलात का ? असे म्हणत गौतम गंभीर याने २०११ च्या विश्वचषक विजयातील सर्व खेळाडूंची नावे घेतली.
टीम इंडियाने २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाला गवसणी घातली होती. भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. विश्वचषकाची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाली होती, ज्यामध्ये श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने विजयी षटकार मारला होता. १९८३ नंतर भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते.
याबाबत एका संकेतस्थळाशी बोलताना गौरम गंभीर म्हणाला की, २०११ च्या विजयाचे आपण युवराज सिंह याला हवे तितके क्रेडिट दिले नाही. इतकेच नाही तर सुरेश रैना, मुनाफ पटेल, सचिन तेंडुलकर अन् झहीर खान यांचीही कामगिरी दमदार होती. सचिन तेंडुलकर सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. पण आपण फक्त धोनीने मारलेल्या एका षटकाराचीच चर्चा करत आहात. मीडिया वारंवार धोनीच्या त्या षटकाराचीच चर्चा करते. तुम्ही फक्त एका खेळाडूचेच चाहते आहात का? तुम्ही संघाला विसरलात का ?
यंदा भारत विश्वचषक जिंकणार का ?
२०११ मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2015 आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत संघाला अनुक्रमे उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले. यावेळी टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकासाठी मैदानात उतरणार आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नईमध्ये होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर १९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.