England vs India 3rd Test Day 4 Stumps : लॉर्ड्स क्रिकेटच्या मैदानावर चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 4 गडी गमावून 58 धावा केल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी अजून 135 धावांची गरज आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला 192 धावांवर रोखल्यानंतर भारतापुढे 193 धावांचे छोटे पण खडतर लक्ष्य ठेवले. भारताकडून केएल राहुल 33 धावांवर नाबाद आहेत आणि नाइट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप त्यांचा साथ देत होता. मात्र, दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सने आकाशदीपला क्लीन बोल्ड करत भारताला चौथा धक्का दिला.
भारतीय गोलंदाजांचा कहर
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने एका ओव्हरमध्ये 2 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी जेव्हा त्यांनी आपला डाव पुढे सुरू केला, तेव्हा भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर धडाकेबाज हल्ला चढवला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 40 धावा केल्या, तर कर्णधार बेन स्टोक्सने 33 धावांचे योगदान दिले. या डावात एक क्षण विशेष गाजला, जेव्हा मोहम्मद सिराजने डकेटला आऊट केल्यानंतर उत्साहात साजरा करताना त्याचा खांदा डकेटला जाऊन लागला. या घटनेने मैदानावर वातावरण तापले.
यशस्वी जैस्वाल शून्यावर, तर शुभमन गिल 6 वर आऊट
लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी फलंदाजी करणं फारच कठीण वाटत होतं. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला, तर करुण नायरने थोडा वेळ लढा दिला, पण 14 धावा करत पॅव्हिलियनमध्ये परतला. सलग दोन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल यावेळी फक्त 6 धावाच करू शकला.
राहुलवर अपेक्षा, पण अजून खडतर वाटचाल
दिवसाच्या शेवटी विकेट न गमावण्यासाठी आकाशदीपला नाइट वॉचमन म्हणून पाठवण्यात आलं. त्याने 10 चेंडू खेळून वेळ काढला, पण शेवटच्या ओव्हरमध्ये स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याची खेळी संपुष्टात आली. आता भारताच्या हातात 6 विकेट्स शिल्लक असून 135 धावांची गरज आहे. केएल राहुलला ऋषभ पंत, नितीश रेड्डी, जडेजा, सुंदर, बुमराह आणि सिराज यांच्याकडून साथ हवी आहे. पाचव्या दिवसावर अखेरचा निकाल अवलंबून असून, मैदानावर जोरदार थरार पाहायला मिळणार हे नक्की...
हे ही वाचा -