England vs India 3rd Test Update : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर जबरदस्त वर्चस्व गाजवत इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 192 धावांवर गुंडाळला. भारताला आता ही कसोटी जिंकण्यासाठी फक्त 193 धावांचे लक्ष्य आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने आग ओकत सर्वाधिक 4 विकेट घेतले, तर बुमराह आणि सिराज यांनी आपल्या वेगवान माऱ्याने प्रत्येकी 2 बळी टिपले. नीतीश रेड्डी आणि आकाशदीप यांनीही प्रत्येकी एक महत्त्वपूर्ण विकेट घेत इंग्लंडचा कणा मोडला.

इंग्लंडच्या फलंदाजांच्या खराब स्थितीचे एक मुख्य कारण म्हणजे लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा मंदावलेला खेळ. भारत आणि इंग्लंड दोघांनीही पहिल्या डावात 387 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोणालाही आघाडी मिळाली नाही. आता इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर आला आहे. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा जो रूटने केल्या, ज्याने त्याच्या बॅटमधून 40 धावा काढल्या.

भारतीय संघाला पहिले यश मोहम्मद सिराजने दिले, ज्याने बेन डकेटला फक्त 12 धावांवर आऊट केले. विकेटचा आनंद साजरा करताना, सिराजच्या खांद्याला डकेटचा खांदा लागला, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. इंग्लंडने 50 धावांपर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या. हॅरी ब्रूकची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली, जो 23 धावा केल्यानंतर आऊट झाला. जो रूट आणि बेन स्टोक्सने पुन्हा एकदा भारतीय संघाला बराच काळ विकेटसाठी आसुसवले, दोघांनी मिळून 67 धावांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी केली. रूट 40 धावा आणि स्टोक्स 33 धावा काढून बाद झाला.

टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य

लॉर्ड्स कसोटीत भारताला 193 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडला 200 धावांपेक्षा कमी धावसंख्येवर रोखण्यात वॉशिंग्टन सुंदरचा सर्वात मोठा वाटा होता, त्याने इंग्लंडच्या 4 फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीत अडकवून त्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघ कधीही 150 धावांचे लक्ष्य गाठू शकलेला नाही. येथे टीम इंडियाचा सर्वात मोठा धावसंख्येचा पाठलाग 136 धावांचा आहे, जो 1986 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली झाला होता.

हे ही वाचा -

Eng vs Ind 3rd Test : लॉर्ड्सवर नवा वाद! इंग्लंड खेळाडूसमोर सिराजचा संयम सुटला, ICC अ‍ॅक्शन मोडवर, जाणून घ्या काय सांगतो नियम? VIDEO