लंडन : आजपासून इंग्लंड आणि श्रीलंका (Sri lanka Vs England विरुद्ध श्रीलंका) यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली. टी-20 मालिकेदरम्यान श्रीलंकेच्या तीन खेळाडूंना बायो बबल नियम मोडण्याने घरी पाठवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाला कमी अनुभवी संघासह मैदानात उतरावे लागले आहे. सर्व 11 खेळाडूंच्या अनुभवाचा विचार केला तर संघाकडे केवळ 198 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे एकट्या इंग्लंडच्या कर्णधारासोबत श्रीलंकेच्या संपूर्ण टीमची तुलना केली तर त्याहीपेक्षा त्यांच्याकडे कमी अनुभव आहे. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनकडे 244 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.


पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. श्रीलंकेकडून चरित असालंका, धनंजय लक्ष्मण आणि प्रवीण जयविक्रमा हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये  पदार्पण करत आहेत. कर्णधार कुशल परेराकडे सर्वाधिक 105 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. दुसर्‍या कोणाकडेही 100 सामने खेळण्याचा अनुभव नाही. प्लेइंग 11 मधील 5 खेळाडूंना तर 10 एकदिवसीय सामन्यांचाही अनुभव नाही. एकदिवसीय सामन्यापूर्वी टी -20 मालिकेत श्रीलंकेचा 0-3 ने पराभव झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेच्या संघाची कामगिरी खाली येत आहे तर दुसरीकडे मानधनाबाबत बोर्ड आणि खेळाडूंमध्ये वादही सुरु आहे.


खेळाडूंना बंदी घातली जाऊ शकते


तिसऱ्या टी-20  सामन्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू कुसाल मेंडिस, विकेटकीपर निरोशन डिकवेला आणि ओपनर धनुष्का गुणततिलका रात्री डरहॅमच्या रस्त्यावर फिरताना दिसले होते. या सामन्यात श्रीलंकेला 89 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात हे तीन खेळाडूही संघाचा भाग होते. या घटनेनंतर तिन्ही खेळाडूंना निलंबित करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या खेळाडूंवर तीन महिन्ये ते एका वर्षासाठी बंदी घातली जाऊ शकते. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांनी ब्रिटनमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.