ENG vs PAK 2nd T20 Match: इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा 23 धावांनी पराभव केला. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 183 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 10 विकेट्स गमावत 19.2 षटकात 160 केल्या. 






जॉस बटलरची तुफानी खेळी-


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 183 धावा केल्या. इंग्लंडकडून जॉस बटलरने 51 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत बटलरने 8 चौकार आणि 2 षटकार टोलावले. विल्स जॅक्सने 23 चेंडूत 37 धावा केल्या. बलटर आणि जॅक्स व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदीने 3 विकेट्स घेतल्या. तर इमाद वसीम आणि हरिस रॉफला प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळाल्या.


पाकिस्तानच्या डावाची खराब सुरुवात-


इंग्लंडने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला एकही धाव करता आली नाही. सॅम आयूब 7 चेंडूवर 2 धावा करत बाद झाला. यानंतर कर्णधार बाबर आझम आणि फखार जमानने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. बाबर आणि फखारमध्ये चांगली भागिदारी झाली. पंरतु पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनी निराश केले. बाबर आझमने 26 चेंडूत 32 धावा केल्या. तर फखार जमानने 21 चेंडूत 45 धावांची खेळी केली. इफ्तिकार अहमदने 23 धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मोइन अली आणि जोफ्रा आर्चरला प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळाल्या. याव्यतिरिक्त क्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या. 


आयरलँडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास-


टी-20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून पाकिस्तान आणि आयरलँडमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला आहे. डबलिन मध्ये झालेल्या मॅचमध्ये आयरलँडनं पाकिस्तानल 5 विकेटनं पराभूत करत इतिहास रचला. आयरलँडनं टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला. 2007 मध्ये पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात आयरलँडनं पराभवाचा धक्का दिला होता. पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6  विकेटवर 182 धावा केल्या होत्या. आयरलँडनं ही मॅच 5 विकेट राखून आणि एक बॉल शिल्लक असताना जिंकली. यानंतर सलग दोन सामने जिंकत पाकिस्तानने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली.