ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वार्नला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहली. दरम्यान, न्यूझीलंडच्या डावातील 23 षटक संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंसह स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी 23 सेकंदासाठी शेन वार्नला श्रद्धांजली वाहली. 


शेन वार्नला श्रद्धांजली वाहलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये न्यूझीलंडच्या डावातील 23 षटक संपल्यानंतर शेन वॉर्नला मैदानावरील स्क्रीनवर दाखवण्यात आलं. त्यावेळी खेळाडू, पंच आणि स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभं राहून वॉर्नच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या आणि 23 सेकंदासाठी त्याला श्रद्धांजली वाहली. क्रिकेटविश्वात अशाप्रकारे श्रद्धांजली वाहण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.


व्हिडिओ-



यावर्षी 4 मार्च 2022 रोजी शेन वॉर्नचा थायलंडमध्ये मृत्यू झालाय. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वार्ननं जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. क्रिकेटविश्वात शेन वार्ननं त्याच्या गोलंदाजीनं आपल्या काळातील जवळपास सर्वच दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. वॉर्ननं त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन 800 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.


हे देखील वाचा-