India vs England Test series : 20 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेतील विजेत्या संघाचा कर्णधार 'पतौडी मेडल'ने सन्मानित केला जाणार आहे. या निर्णयामुळे क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, पतौडी कुटुंबाचे नाव भारत-इंग्लंड क्रिकेट इतिहासात अजरामर होणार आहे.

इफ्तिखार अली खान पतौडी आणि त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी हा भारताचा एक महान कर्णधार होता. दोघांनीही भारतासाठी कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट देखील खेळले. यामुळेच भारत-इंग्लंड कसोटी मालिका वर्षानुवर्षे 'पतौडी ट्रॉफी' म्हणून खेळली जात आहे.

तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीवरून वाद

अलीकडेच, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या ट्रॉफीचे नाव बदलून तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची औपचारिक घोषणा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान लॉर्ड्सवर होणार होती, परंतु अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही थेट ईसीबीशी संपर्क साधला आणि पतौडी कुटुंबाचे नाव भारत-इंग्लंड क्रिकेट इतिहासाचा भाग राहावे अशी विनंती केली.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही हा प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जय शाह आणि तेंडुलकर यांच्या पुढाकारानंतर ईसीबीने सहमती दर्शवली आणि निर्णय घेतला की ट्रॉफीचे नाव 'तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी' असले तरी, 'पतौडी मेडल' मालिकेतील विजेत्या कर्णधारालाही देण्यात येईल.

औपचारिक घोषणा 19 जून रोजी होणार... 

लीड्समध्ये होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या एक दिवस आधी याची औपचारिक घोषणा केली जाईल. तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, तर जेम्स अँडरसन हा कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. या निर्णयानंतर, भारत-इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात राजेशाही पतौडी घराण्याचे नाव नेहमीच आदराने जोडले जाईल.

हे ही वाचा -

Jasprit Bumrah News : बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का