Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशानूसार त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन त्यांची चौकशी केली. तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना देखील दिल्या. 


क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विनोद कांबळींना वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. 


एकनाथ शिंदे अन् श्रीकांत शिंदे विनोद कांबळींना भेटणार-


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत, अशी माहिती मंगेश चिवटे यांनी यावेळी दिली.


विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?


रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या. आता मंगळवारी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. डॉ. त्रिवेदी यांनी असेही उघड केले की रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस सिंग यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलं. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.


विनोद कांबळींची कारकीर्द-


विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकि‍र्दीची सुरुवात 1991 मध्ये झाली. 1991 साली त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर 1993 साली त्यांनी कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. 2000 च्या दशकात विनोद कांबळी यांचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला. म्हणून त्यांना 2000 सालानंतर टीम इंडियात स्थान मिळाले नाही. विनोद कांबळी 2000 साली शारजाहमध्ये शेवटची मालिका खेळले होते. त्यानंतर टीममध्ये कमबॅकसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.