Duleep Trophy India A wins title after win vs IND C : मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. तिसऱ्या फेरीत खेळल्या गेलेल्या सहाव्या सामन्यात मयंक अग्रवालच्या भारत अ संघाने ऋतुराज गायकवाडच्या कर्णधार असलेल्या भारत क संघाचा 132 धावांनी पराभव केला. या विजयासह भारत अ संघाने दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपदही पटकावले. संघाने पहिला सामना गमावला होता, पण त्यानंतर भारत अ संघाने शानदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावले.
मयंकचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर
दुलीप ट्रॉफी गुणतालिकेत भारत अ संघ 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मयंक अग्रवालच्या संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले. तर भारत क संघाला केवळ एका सामन्यात विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली. हा संघ नऊ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत ब संघ तिसऱ्या क्रमांकावर तर भारत ड संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दोघांचे अनुक्रमे सात आणि सहा गुण आहेत.
साई सुदर्शनची शतक पाण्यात
या सामन्याच्या चौथ्या डावात भारत क संघाला विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ऋतुराज गायकवाडने 44 धावा केल्या. साई सुदर्शनने शतकी खेळी खेळली. त्याने 206 चेंडूत 111 धावा केल्या. खालच्या फळीतील फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्याचवेळी भारत अ संघाकडून प्रसिध कृष्णा आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आकिब खानने दोन यश मिळवले.
काय घडलं मॅचमध्ये?
भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना शाश्वत रावतच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 297 धावा केल्या. यादरम्यान त्याने 15 चौकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. विजयकुमार विशाकने चार, अंशुल कंबोजने तीन आणि गौरव यादवने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात भारत क संघ पहिल्या डावात केवळ 234 धावा करू शकला. अभिषेक पोरेल (81) आणि पुलकित नारंग (41) यांच्याशिवाय एकही फलंदाज चालला नाही. आवेश खान आणि आकिब खानने प्रत्येकी तीन तर तनुषने दोन आणि शम्स मुलाणीने एक गडी बाद केला. त्यामुळे भारत अ संघाने 63 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात मयंक अग्रवालच्या संघाने आठ गडी गमावून 286 धावा केल्या. रियान परागने 73 धावांची तर शाश्वतने 53 धावांची खेळी खेळली. अशा प्रकारे भारत अ संघाची आघाडी 349 धावांची झाली. प्रत्युत्तरात भारत क संघ 217 धावांवर सर्वबाद झाला. भारत अ संघाने हा सामना 132 धावांनी जिंकला.