Asia cup 2023, Tilak Varma : आशिया चषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. तिलक वर्माला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्णधार रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी तशी हिंट दिली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी 12 वाजता आशिया चषकासाठी संघ निवड होणार आहे. संघ निवडीच्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 वाजता निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषद घेणार आहेत.   तिलक वर्माच्या निवडीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


आयपीएलमध्येही त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले होते. या मालिकेत तिलक वर्माने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर तिलक वर्माला आशिया चषक आणि विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी देण्यात यावी, या मागणीने जोर धरला. माजी क्रिकेटरनेही याबाबतचे आपले मनोगत व्यक्त केले होते. राहुल शर्मा यानेही तशी हिंट दिली होती. आता उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये तिलक वर्मा याच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 


तिलक वर्मा याची जमेची बाजू म्हणजे तो डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करतो. भारताच्या मधल्या फळीत सध्या डाव्या हाताचे फलंदाज नाहीत. त्यामुळे तिलक वर्मा याचा समावेश केला जाऊ शकतो. श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त आहे की नाही, याबाबत सस्पेन्स आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना मधल्या फळीत लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विश्वचषकाआधी भारतीय संघ तिलक वर्मा याला संधी देऊ शकते. अय्यर आणि राहुल तंदुरुस्त नसल्यास तिलक वर्मा याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. 


तिलक वर्मा याच्याबद्दल....


तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केलेय. मुंबईचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप गेल्यानंतर तिलक वर्मा याने एकहाती डाव सांभाळत आपली प्रतिभा दाखवून दिली होती. तिलक वर्मा याने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले. तिलक वर्मा याला अद्याप एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेली नाही. मधल्या फळीत तिलक वर्मा याने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. वेस्ट इंडिजविरोधातही त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वांची वाह वाह मिळवली होती. तिलक वर्मा याने आतापर्यंत आयपीएलमधील 25 डावात 740 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  सहा आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये तिलक वर्मा याने 173 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धसतकाचा समावेश आहे. 15 चौकार आणि सात षटकार ठोकले आहेत. टी20 मध्ये एक विकेटही त्याने घेतली आहे.