Deepak Chahar Wedding Invitation MS Dhoni Sakshi Virat Kohli Anushka Rohit Sharma Ritika : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर लवकरच लग्नाच्या बंधणात अडकणार आहे. दीपक चाहर आणि जया भारद्वाज आयपीएल संपताच एक जून रोजी लग्न करणार आहेत. दीपक चाहरने धोनीसह भारतीय क्रिकेटपटूंना लग्नाचे आमंत्रण दिलेय. दीपक चाहरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. गतवर्षी दीपक चाहरने आयपीएलच्या सामन्यानंतर स्टेडिअममध्येच जया भारद्वाजला प्रपोज केले होते. 


इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, दीपक चाहरच्या कुटुंबांनी अनेकांना आमंत्रण दिलेय. दीपक चाहरच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले की, 'धोनी आणि त्याची पत्नी साक्षी, रोहित शर्मा आणि रितिका, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात आलेय.'  धोनी-साक्षी आणि विराट-अनुष्का चाहरच्या लग्नाला उपस्थिती दर्शवू शकतात, असा अंदाज बांधला जातोय. 


 स्टेडिअममध्ये केले होते प्रपोज - 
गतवर्षी आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत पार पडला होता. सात ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना पार पडला. सामना संपल्यानंतर दीपक चाहरने स्टेडिअममध्येच प्रेयसी जया भारद्वाज हिला लग्नासाठी प्रपोज केले होते.  दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. यावेळी, आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. 


यंदा आयपीएलमध्ये नाही चाहर -
दीपक चाहरला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या मेगा ऑक्शन 2022 मध्ये तब्बल 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते. पण दीपक चाहर चेन्नईसाठी एकही सामना खेळू शकला नाही. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो संपूर्ण आयपीएलला मुकला. 


कोण आहे जया भारद्वाज?
दीपक चाहरची होणारी पत्नी जया भारद्वाज दिल्लीमधील बारहखंबा येथे राहणारी आहे. बिग बॉस-5 (वर्ष-2011) मध्ये सहभाग नोंदवलेल्या अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिद्धार्थ MTV चा प्रसिद्ध शो स्पिल्ट्स विला सह इतर अनेक शोमध्ये दिसलाय. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. जया एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहर बहिण मालती चाहरमार्फत जयाला भेटला होता. तेथूनच दोघांमध्ये प्रामाचे अंकूर फुटले.