ODI World Cup 2023 Qualifiers ZIM vs SCO: वेस्ट इंडिजनंतर झिम्बाब्वेचाही विश्वचषकातून गाशा गुंडाळला आहे. सुपर 6 फेरीत स्कॉटलँडने झिम्बाब्वेवर 31 धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे झिम्बाब्वेचं भारतात होणाऱ्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. स्कॉटलँडकडून पराभव झाल्यानंतर सिकंदर रझा याला अश्रू अनावर आले. सामन्यानंतर सिकंदर रझा ढसाढसा रडला. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ आधीच पात्र ठरला आहे. आता दुसऱ्या संघासाठी नेदरलँड आणि स्कॉटलँड या दोन संघामध्ये चुरस आहे. दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज संघानंतर सीन विलियम्सच्या नेतृत्वातील झिम्बाब्वे संघाचेही स्वप्न भंगलं आहे. 


सुपर 6 फेरीतील महत्वाच्या सामन्यात स्कॉटलँड संघाने झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलँड संघाने 234 धावांपर्यंत मजल मारली होती. पण  झिम्बाब्वेच्या संघाला हे आव्हान पार करता आले नाही. 41.1 षटकात झिम्बाब्वेचा संघ 203 धावांवर संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून रयान बर्ल याने दमदार फलंदाजी केली. त्याने 84 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. त्याशिवाय सिकंदर रझा याने 40 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. स्कॉटलँड संघाकडून  क्रिस सोल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याशिवाय ब्रँडन मॅकमुलन आणि मायकल लीस्क यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. साफयान शरीफ, मार्क वॅट आणि क्रिस ग्रेव्स यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.   
 यजमान झिम्बाब्वेला 31 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 


झिम्बाब्वेचा कर्णधार सीन विलियम्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलँडने दमदार सुरुवात केली.  पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी झाली. पण नंतर डाव कोसळला. स्कॉटलँडने आठ विकेटच्या मोबदल्यात 234 धावांपर्यंत मजल मारली.  स्कॉटलँडसाठी मायकल लीस्क याने सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय मॅथ्यू क्रॉस आणि ब्रँडन मॅकुलम यांनी अनुक्रमे 38 आणि 43 धावांचे योगदान दिले.  


सिकंदर रझा ढसाढसा रडला
भारतात होणाऱ्या विश्वचषकातील आव्हान संपल्यानंतर झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा ढसाढसा रडला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. क्वालिफायर फेरीमध्ये सिकंदर रझा याने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले होते. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने मोलाचं योगदान दिले होते.