Cristiano Ronaldo's Goals: जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) त्याच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. गुरुवारी रात्री त्याने आपल्या लीग कारकिर्दीतील 500 गोल पूर्ण केले. तो सध्या सौदी अरेबियाच्या फुटबॉल लीगमध्ये खेळत असून तेथील अल नसर फुटबॉल क्लबमधून खेळताना रोनाल्डोने नुकत्याच एका सामन्यात 4 गोल मारत संघाला विजय मिळवून दिला आणि मोठा रेकॉर्डही नावावर केला आहे.


गुरुवारी रात्री अल नासरचा सामना अल वाहदाविरुद्ध (al Nassr vs Al Wehda) होता. या सामन्यात रोनाल्डोने 21व्या मिनिटाला डाव्या पायाने अप्रतिम अशी किक मारून गोल केला. हा त्याचा लीग कारकिर्दीतील 500 वा गोल ठरला. रोनाल्डो इथेच थांबला नाही. त्याने बॅक टू बॅक आणखी तीन गोल केले. रोनाल्डोच्या कारकिर्दीतील ही 61वी हॅट्ट्रिक होती. अल नासरने हा सामना 4-0 अशा दमदार फरकाने जिंकला आणि रोनाल्डोनेही तब्बल 503 लीग गोल नावावर केले.


5 लीग, 5 क्लब आणि 503 गोल


ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात पोर्तुगालमधील स्पोर्टिंग लिस्बन क्लबमधून झाली. त्याने आपल्या पहिल्या फुटबॉल क्लबसाठी एकूण तीन गोल केले. एका हंगामानंतर तो लिस्बनहून मँचेस्टर युनायटेडला गेला. त्याने मँचेस्टर युनायटेडसाठी एकूण 103 गोल केले. त्यानंतर रिअल माद्रिदसाठी (311) सर्वाधिक गोल त्याने केले. त्याने इटलीच्या आघाडीच्या क्लब युव्हेंटससाठी देखील 81 गोल केले. सध्या तो सौदी अरबेयामधील क्लब अल नासरसाठी खेळत असून एकूण 5 गोल त्याने केले आहेत. अशाप्रकारे, रोनाल्डोने आतापर्यंत 5 फुटबॉल लीगमध्ये खेळताना 5 वेगवेगळ्या फुटबॉल क्लबच्या जर्सीमध्ये एकूण 503 लीग गोल केले आहेत.






मँचेस्टर युनायटेडशी वाद  


सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल आणि सर्वाधिक चॅम्पियन्स लीग गोल करण्याचा विक्रम आणि पाच वेळा बलॉन डी'ओर पुरस्कार विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदीच्या क्लबमध्ये आहे. 38 वर्षीय रोनाल्डो अजूनही फुटबॉल खेळण्यासाठी पूर्णपणे फिट दिसत आहे. मात्र, गेल्या वर्षी मँचेस्टर युनायटेडमध्ये काही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसवण्यात आलं होते, त्यानंतर युनायटेडच्या व्यवस्थापनासोबतचा त्याचा वादही चव्हाट्यावर आला होता. याच कारणामुळे त्याला मँचेस्टर युनायटेड सोडावे लागले.


हे देखील वाचा-