Shikhar Dhawan Nervous 90s : भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने तीन धावांनी जिंकला. यावेळी कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) धमाकेदार फलंदाजी करत 97 धावा ठोकल्या. केवळ 3 धावांनी त्याचं शतक हुकलं ज्यामुळे 90 हून अधिक धावा करुनही शतक न झळकावण्याची त्याची ही सहावी वेळ ठरली. क्रिकेटच्या भाषेत यालाच 'नर्व्हस 90' म्हणत असून सहाव्यांदा शिखर याचा शिकार झाला. पण कर्णधार म्हणून शिखरने अर्धशतक पूर्ण केल्याने भारतासाठी सर्वाधिक वयात अर्धशतक झळकावणारा खेळाडू शिखर बनला आहे. 


शिखरने 36 वर्षे 229 दिवसांचा असताना भारतासाठी एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. शिखरच्या आधी हा रेकॉर्ड मोहम्मद अझहरुद्दीन याच्या नावावर होता. अझहरुद्दीनने 36 वर्षे 120 दिवसांचा असताना ही कर्णधार म्हणून खेळत अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर या यादीत सुनील गावस्कर (35 वर्षे 225 दिवस), एमएस धोनी (35 वर्षे 208 दिवस) आणि रोहित शर्मा (35 वर्ष 73 दिवस) यांचा समावेश आहे.


सहाव्यांदा 'नर्व्हस 90' चा शिकार


या सामन्यात 97 धावा करुन शिखर बाद झाला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 90 पेक्षा अधिक धावा करुनही शतक न झळकावता आल्याची शिखरची ही सहावी वेळ आहे. यामुळे शिखर अशाप्रकारे बाद होण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर (18) तर दुसऱ्या स्थानावर मोहम्मद अझहरुद्दीन (7) आहे. 


हे देखील वाचा-