S Sreesanth News : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आणि वादाचे जुने नातं आहे. श्रीसंतने मैदानात आणि मैदानाबाहेरही अनेकदा वाद केले आहेत. त्यामुळे तो चर्चेतही आला. त्याच्यावर आयपीएल स्पॉट फिक्सिंगमुळे बंदीही घालण्यात आली, नंतर बंदी हटवण्यात आली. त्याने चित्रपटातही आपले नशीब अजमावले. पुन्हा क्रिकेटमध्येही उतरला. पण त्याच्या अडचणी कमी होत नाहीत. 2007 टी 20  आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेला एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. श्रीसंतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केरळ पोलिसांनी एस श्रीसंतविरुद्ध गुन्हा दाखल केलेय.


प्रसार माध्यमांच्या वृत्तांनुसार, एस श्रीसंत (S Sreesanth) याच्यासह तीन जणांवर केरळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल 2019 मधील हे प्रकरण आहे. कर्नाटकच्या कोल्लूरमध्ये एक स्पोर्ट्स अकादमी बनवण्यासाठी राजीव कुमार, एस श्रीसंत आणि वेंकटेश किनी यांनी एका तरुणाकडून 18 लाख रुपये घेतले होते. पण क्रिकेट अकादमीमध्ये त्या तरुणाला पार्टनर केले नाही. त्यामुळे तरुणाने आता पोलिसात धाव घेतली. त्या तरुणाचे नाव सरीश गोपालन असून तो चुंडा येथील रहिवासी आहे. 


सरीश म्हणाला की, स्पोर्ट्स अकादमी बनवण्यासाठी हा पैसा लावला होता. मलाही त्यामध्ये पार्टनर करतील, अशी मला आशा होती. पण मला पार्टनर केले नाही. त्यामुळे मी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सरीशच्या तक्रारीनंतर श्रीसंतसह तिघांविरुद्ध  कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळ पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 














श्रीसंतची कारकिर्द


श्रीसंतच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने 27 कसोटी सामन्यात 87 विकेट्स, 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट्स आणि 10 टी20 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्येही त्याने काही सामने गाजवले असून 44 आयपीएलच्या सामन्यात त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये श्रीसंतने 281 धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात 44, टी20 सामन्यात 20 आणि आयपीएलमध्ये 34 धावा केल्या आहेत.