Imad Wasim Umpire Decision Change CPL 2024 नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अनेक छोटे मोठे वाद होत असतात. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये असाच एक प्रसंग घडला आहे. पंचांनी एका फलंदाजाला बाद दिलं, त्यानंतर त्याला पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी बोलावण्यात आलं. त्याच फलंदाजानं जोरदार फटकेबाजी केल्यानं संघानं विजय मिळवला. पंचांच्या या निर्णयावरुन वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स आणि अँटीग्वा अँड बाहबुडा फैल्कस यांच्यात मॅच सुरु होती. पाकिस्तानचा फलंदाज इमाद वसीम ला बाद दिलं होतं, त्या निर्णयावर नाराजी दर्शवत तो मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर त्याला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
एबीएफ चा संघ या मॅचमध्ये 135 धावांचा पाठलाग करत होता. मॅचच्या दहाव्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर सुनील नरेन याच्या गोलंदाजीवर विकेटकीपरनं हसन खान याला 36 धावांवर बाद केलं होतं. त्याच्याच पुढच्या बॉलवर इमाद वसीम याच्या विरोधात एलबीडब्ल्यू बाद असल्याची अपिल करण्यात आली. यावर मैदानावरील पंचांनी इमाद वसीमला नाबाद ठरवलं, यावर नाईट रायडर्टसचा कॅप्टन केरॉन पोलार्डनं डीआरएस घेतला. यानंतर मैदानावरील पचांना निर्णय बदलावा लागला. इमाद वसीमला बाद देण्यात आलं.
इमाद वसीम बाद अन् नाबाद, पंचांसोबत वाद
इमाद वसीमला बाद देण्यात आल्यानंतर तो पंचांजवळ गेला आणि त्यानं बॉल पहिल्यांदा बॅटला लागल्याचं सांगितलं. मात्र, पंचांनी बाद ठरवल्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. यानंतर एबीएफ टीमचा सहायक प्रशिक्षक कर्टली एम्ब्रोज यांनी डगआऊटमध्ये या घटनेचा रिप्ले पाहिला आणि ते बाहेर आले. इमाद वसीमला बाद दिल्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला. पंचाच्या दिशेनं हातवारे केले. यानंतर पंचांनी निर्णय बदलला आणि इमाद वसीमला पुन्हा फलंदाजीला बोलावलं.
इमाद वसीमला पुन्हा फलंदाजीला बोलावल्यानं केरॉन पोलार्डनं पंचांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. नाईट रायडर्सचे कोच फिल सिमंस यांनी देखील बाहेरुन इशारा केला. मैदानावर जवळपास 12 मिनिटं राडा सुरु होता. मात्र, पंचांनी निर्णय बदलला इमाद वसीमला नाबाद देण्यात आलं. ज्या वसीमला शुन्यावर बाद देण्यात आलं होतं. त्यानं मैदानावर परत येत 27 बॉलमध्ये 36 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
इतर बातम्या :