ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास फक्त 20 दिवस बाकी आहेत, परंतु स्पर्धेची तयारी अद्याप पुर्ण झालेली नाही. एकीकडे, पाकिस्तानमध्ये स्टेडियम तयार करण्याची अंतिम मुदत सतत वाढत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने अद्याप या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, सर्व संघांना स्पर्धेच्या एक महिना आधी त्यांचे संघ जाहीर करावे लागतात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या 8 पैकी 7 संघांनी त्यांच्या संघाची घोषणा केली आहेत, परंतु पाकिस्तान संघ अजून पण जाहीर केला नाही. आता असे दिसते की पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केल्याबद्दल पश्चात्ताप होत आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने पाकिस्तानला 70 दशलक्ष डॉलर्सचे निधी दिला होता, परंतु स्टेडियम अद्याप तयार झालेले नाहीत. वृत्तानुसार, पीसीबीने रावळपिंडी, कराची आणि लाहोरमधील स्टेडियम तयार करण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ मागितला आहे. जर पाकिस्तानने असे केले नाही तर संपूर्ण स्पर्धा बाहेर हलवली जाऊ शकते.
राजकीय मुद्द्यांमुळे भारताने आधीच पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलच्या आधारे खेळवली जात आहे. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. जर पाकिस्तानने वेळेवर स्टेडियम तयार केले नाही तर आयसीसी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानहून यूएईला हलवू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यजमान पाकिस्तानचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान आहे. यानुसार, पाकिस्तान संघ रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसू शकतो. क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पीसीबी सईम अयुबला त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्याची प्रत्येक संधी देत आहे. त्यामुळे संघाची घोषणा करण्यासाठी उशीर होत आहे. जर अयुब वेळेत बरा होऊ शकला नाही, तर अनुभवी फलंदाज शान मसूद त्याची जागा घेऊ शकतो आणि फखर झमान संघात परतू शकतो.
क्रिकेट पाकिस्तानने त्यांच्या सूत्रांचा हवाला देत असेही म्हटले आहे की, पीसीबी फेब्रुवारीच्या पहिल्या तीन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. 8 फेब्रुवारीपासून पाकिस्तान दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसोबत तिरंगी मालिका खेळणार आहे.
हे ही वाचा -