ICC World Test Championship Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल अवघ्या काही तासात सुरु होणार आहे. दोन वर्षांमध्ये आठ संघामध्ये WTC साठी लढत सुरु होती. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. दुखापतीचा फटका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियालाही बसलाय. ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल हे भारतीय दिग्गज दुखापतीमुळे फायनलला मुकले आहेत. आता दुखापतीचा फटका ऑस्ट्रेलियालाही बसलाय. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने जोस हेजलवूडची जागा घेणाऱ्या गोलंदाजाबाबत माहिती दिली आहे. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत, पॅट कमिन्स याने जोश हेजलवूड याच्या जागी स्कॉट बोलँड याला संधी दिली जाणार असल्याचे सांगितलेय. जोश हेजलवूड (Josh Hazlewood)याच्या जागी ऑस्ट्रेलियाने मायकल नेसर (Michael Neser) याला ताफ्यात सामील केले होते. त्यामुळे नेसर याला संघात स्थान मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्कॉट बोलँड (Scott Boland) हा ऑस्ट्रेलियाकडून खेळताना पाहायला मिळेल.
स्कॉट बोलँड याचे करिअर -
स्कॉट बोलँड याने वयाच्या 32 व्या वर्षी 2021मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धच्या ऍशेज मालिकेदरम्यान आपले कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर बोलँड सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे. स्कॉट बोलँड याने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केलेय. या सामन्यादरम्यान बोलँड याने 13.42 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्यात. यादरम्यान एक वेळा 4 विकेट्स आणि एक वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 7 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स ही त्याची बोलँडची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ कसा असेल -
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ताकतीने उतरेल. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा सलामीला येण्याची शक्यता आहे. मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असतील. ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी मध्यक्रम सांभाळतील.... पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.
ऑस्ट्रेलियाची संभावित प्लेईंग 11
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टिव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड