नवी दिल्ली :  आयपीएलचं 17 वं पर्व संपल्यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे.  वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. तर चार खेळाडूंना राखीव म्हणून स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडियानं (Team India) 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर भारताला तशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताला विजेतेपद मिळवायचं असल्यास रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासोबतच मिस्टर 360 अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार आहे. वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara) यांनी सूर्यकुमार यादव बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 


ब्रायन लारा सूर्यकुमार यादवबद्दल काय म्हणाले?


ब्रायन लारा यांनी सूर्यकुमार यादवनं टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी तिसऱ्या स्थानावर फलंदाजी केली पाहिजे असं म्हटलंय. टीम इंडियामध्ये बीसीसीआयनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघात पुन्हा स्थान दिलंय. तर, शुभमन गिल आणि रिंकू सिंग राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असतील. या परिस्थितीत सूर्यकुमार यादव हा संघाचा प्रमुख खेळाडू ठरतो. त्यामुळं माझा एक सल्ला आहे, तुम्हाला आवडेल की न आवडेल सूर्यकुमार यादव खेळवावं लागेल, असं ब्रायन लारा म्हणाले. 


सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या स्थानावर फलंदाजी केली पाहिजे. तो टी-20 क्रिकेटमधील महान खेळाडू आहे.सूर्यकुमार यादव हा सलामीचा फलंदाज नाही. त्यानं 10 ते 15 ओव्हर बॅटिंग केल्यास काय घडतं ते तुम्हाला माहिती आहे, असं ब्रायन लारा म्हणाले.


सूर्यकुमार यादव पहिल्यांदा फलंदाजी करेल तेव्हा तो तुम्हाला चांगल्या स्थितीत पोहोचवून ठेवेल. तर, दुसऱ्या डावात फलंदाजी करेल तेव्हा तो तुम्हाला विजय मिळवून देईल, असं ब्रायन लारा म्हणाले. 


दरम्यान, सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी चौथ्या स्थानावर फलंदाजी करतो.  विराट कोहली सध्या तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करतो. जर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं डावाची सुरुवात केली तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करु शकतो. मात्र, अशा स्थितीत यशस्वी जयस्वालला संघाबाहेर बसावं लागू शकतं. काहीही करुन सूर्यकुमार यादवला तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी द्या, असं ब्रायन लारा म्हणाले.   


संबंधित बातम्या : 


दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, राजस्थानचा 20 धावांनी पराभव, संजूची वादळी खेळी व्यर्थ


RR vs DC : संजू सॅमसननं दिल्लीच्या विजयाचं क्रेडिट कुलदीप, मॅक्गर्क नव्हे तिसऱ्याच खेळाडूला दिलं...