India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा सामना नऊ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होत आहे. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता निर्णायक कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेय. तीन कसोटी सामन्यात विकेटकीपर केएस भरत याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरत याला संघात स्थान देण्यात आले आहे. पण भरत याला फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ईशान किशन याला संधी द्यावी, अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात येत आहे. यावर कोच राहुल द्रविड यांनी कुणाला संधी मिळणार, याची हिंट दिली आहे. 


चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांना भरत याच्या फलंदाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी द्रविड बचावासाठी पुढे आले, ते म्हणाले की, यामुळे आम्ही चिंतेत नाही. आव्हाने आणि परिस्थिती समजून घेण्यास भरतला थोडा वेळ लागेल.  भरत याने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत मोठं योगदान दिलेलं नाही. पण तो प्रतिभावंत खेळाडू आहे. 


द्रविड म्हणाले की, 'दिल्ली कसोटीमध्ये भरतने महत्वाचं योगदान दिले होते. तो सकारात्मक फलंदाजी करत होता. पण फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तुम्हाला नशिबाची साथही मिळायला हवी. कदाचीत ते नशीब भरतसोबत  नव्हते.  पण भरतची फलंदाजी सुधारत आहे, त्याचं यष्टीरक्षण जबरदस्त आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून फलंदाजीतील कामगिरी पाहण्याची गरज आहे. ' राहुल द्रविड यांनी भरत याला अहमदाबाद कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.


केएस भरतची कामगिरी -
मागील दोन वर्षांपासून टीम इंडिया केएस भरत याला ऋषभ पंत याचा बॅकअप म्हणून तयार करत होती. पण भरत याला संधीचं सोनं करता आले नाही. तिन्ही कसोटी सामन्यात भरत याला फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाच डावात भरत याने 8, 6, नाबाद 23, 17 आणि 3 धावा केल्या आहेत. भरत याला पाच डावात फक्त 57 धावा करता आल्या आहेत. फलंदाजीत भरत अपयशी ठरला असला तरी विकेटकिपिंग प्रभावी केली आहे. फिरकीच्या कठीण खेळपट्टीवर भरत याने प्रभावी यष्टीरक्षण केलेय. 


भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनादकट.


ऑस्ट्रेलियाचा संघ : स्कॉट बोलैंड, एलेक्स केरी, कॅमरुन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रैविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुह्नमन, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिशेल स्वेपसन.