Mitchell Starc : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नागपूरनंतर दिल्ली कसोटीत पाहुण्या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. आता या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान इंदूर कसोटीपूर्वी कांगारू संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell starc) इंदूर कसोटीत खेळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मिचेल स्टार्क पूर्णपणे फिट असून तो सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
'मी पूर्णपणे बरा झालो नाही, पण...'
आधीच्या कसोटीत मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नव्हता, मात्र आता हा वेगवान गोलंदाज इंदूर कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मिचेल स्टार्क म्हणाला की आता मला बरे वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून मला बरे वाटत नव्हते, पण आता मी ठीक आहे. मी 100 टक्के तंदुरुस्त आहे असे मला वाटत नाही, पण मी सामने खेळण्यासाठी पुरेसा फिट आहे, मी सामना खेळू शकतो. पुढे बोलताना तो म्हणाला की मला गोलंदाजी करताना खूप भारी वाटत आहे. तसंच, तो म्हणाला की पूर्णपणे फिट नसतानाही मी सामना खेळण्याची ही पहिली वेळ नाही, मी यापूर्वीही असे केले आहे.
'स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची'
मिचेल स्टार्क पुढे म्हणाला की, ''जर मी 100 टक्के तंदुरुस्त होण्याची वाट पाहिली तर मी फार कमी कसोटी सामने खेळू शकेन. या मालिकेत आमच्या वेगवान गोलंदाजांसमोर आव्हानं उभी राहिली आहेत, पण फिरकीपटूंच्या खांद्यावर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजाची भूमिका महत्त्वाची ठरते. पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिसर्या कसोटीतही फिरकीपटूंची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे यात शंका नाही, पण मला माहीत आहे की फिरकीपटूंसोबत विरोधी संघातील 20 खेळाडूंना बाद करण्यात- माझीही भूमिका महत्त्वाची असेल.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांत स्पिनर्सची धमाकेदार खेळी
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्पिनर्सचं वर्चस्व होतं. स्लो बॉलर्सनी एकूण 52 बळी घेतले आहेत. पण इंदूर कसोटीत फास्ट बॉलर्ससाठी उत्तम संधी आहे. गेल्यावेळी इंदूरमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालनं दुहेरी शतक झळकावलं होतं. तर मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी मिळून 14 विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने तो कसोटी सामना अवघ्या 3 दिवसांत जिंकला होता.
हे देखील वाचा-