MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. धोनीच्या कार्यकाळात भारतीय संघानं (Team India) क्रिकेटविश्वात नवी उंची गाठलीय. यातच धोनीची पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) धोनीला भारतीय संघात कायमस्वरुपी काम करण्यासाठी आमंत्रण पाठवणार आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात असून बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडू इच्छित नाही. 


धोनीचं भारतीय संघासोबतचे काम वेगळ्या प्रकारचं असेल. त्याच्यावर फक्त टी-20 संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यातही त्याला निवडक खेळाडूंसोबत काम करावं लागेल. एकंदरीत त्याचं काम डायरेक्टर ऑफ क्रिकेटसारखं असेल. 2021च्या टी-20 विश्वचषकात धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आलं होतं. पण या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या फेरीतच सामान गुंडाळावं लागलं होतं. महत्त्वाचं म्हणजे, एक किंवा दोन आठवड्यात कोणत्याही मार्गदर्शकाला संघ बदलणं अवघड आहे. धोनीला कायमस्वरूपी स्थान मिळाले तर तो संघाची स्थिती नक्कीच बदलू शकतो, असा बीसीसीआयचा विश्वास आहे.


 मुख्य प्रशिक्षकाच्या खांद्यावरील ओझं कमी करण्याचा प्रयत्न
सध्या भारतीय संघ जास्त प्रमाणात क्रिकेट खेळत आहे.ज्यामुळं खेळाडू तिन्ही फॉरमेटमध्ये क्रिकेट खेळणं टाळत आहेत. जर एखाद्या संघाला तिन्ही फॉरमॅटसाठी मुख्य प्रशिक्षक असेल तर त्यांच्याकडं पर्याय राहत नाही. हे लक्षात घेऊन बीसीसीआयला राहुल द्रविडचा भार कमी करायचा आहे. टी-20 क्रिकेटमध्ये धोनीचा अनुभव दांडगा आहे. ज्याचा संघाला फायला होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं धोनीला पुन्हा संघात घेऊन येण्यासाठी बीसीसीआयच्या संघाची धडपड सुरू आहे. 


आयसीसीच्या तीन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.


महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि  98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 10 हजार 773 धावांची नोंद आहे. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-