T20 World Cup Final, NZ vs AUS : सांघिक खेळाडूंच्या जोरावर जेतेपदाचा दावा करणारा न्यूझीलंड आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेत तुफानी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia) या दोन तुल्यबळ संघामध्ये आज, टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2021) अंतिम सामना होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता दुबईच्या मैदानावर टी-20 चा नवा चॅम्पियन मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही टी20 चा विश्वचषक जिंकलेला नाही. पण यंदा दोन्ही संघांना ती संधी चालून आलीय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण दुबईतल्या मैदानात जिंकणार कोण? हे सामन्याआधीच्या नाणेफेकीवरही तितकंच अवलंबून आहे.
उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघानं इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघाच्या जेतेपदावर नजरा असतील. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया 2015 एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात एकमेंकासमोर आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारली होती. त्यानंतर सहा वर्षानंतर दोन्ही संघ फायनल सामन्यासाठी एकमेंकासमोर उभे राहिलेत. 2015 मधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी संयमी न्यूझीलंड संघाकडे चालून आली आहे.
साखळी फेरती न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. फलंदाजी कमकुवत वाटत होती. मात्र, उपांत्य सामन्यात फलंदाजांनीही दमदार पुनरागमन केलेय. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, अॅडम मिल्ने या वेगवान त्रयीसह इश सोधी आणि मिचेल सँटनर ही फिरकी जोडी न्यूझीलंडच्या संघाची ताकद आहे. ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचं झाल्यास फलंदाजी आणि गोलंदाजी एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. फिंच-वॉर्नर जगातील सर्वोत्कृष्ट सलामी जोडीपैकी एक आहे. त्यानंतर मार्श, मॅक्सवेल, स्मिथ, स्टॉयनिस आणि वेडसारखे आक्रमक आणि दर्जेदार फलंदाज आहेत. गोलंदाजीतही स्टार्ट, हेजलवूड आणि कमिन्स या त्रिकुटाच्या जोडीला फिरकीपटू जम्पा भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे रविवारी रात्री होणारा सामना रोमांचक होईल, यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याने टी-20 विजेतेपद जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय. स्पर्धा सुरु होण्याआधी आम्हाला कमी आखल्याची खंतही फिंचनं व्यक्त केली.
कधी अन् कुठे पाहाल सामना -
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सायंकाळी सात वाजता नाणेफेक होणार आहे. साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 या चॅनलवर असेल. शिवाय हॉटस्टारवरही सामना पाहू शकता.