Australia Playing XI for Gabba Test : भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. संघाने आपल्या फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल केलेला नाही. खराब फॉर्म असूनही उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ सारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. संघाने मॅकस्विनीला सलामीला आपले स्थान निश्चित करण्याची आणखी एक संधी दिली आहे. मात्र, संघाच्या गोलंदाजीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूडचा संघात समावेश केला आहे, तर ॲडलेडमध्ये स्फोटक कामगिरी करूनही स्कॉट बोलंडला बाहेरचा रस्ता दाखवला.
स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेझलवूड
जोश हेझलवूडने पर्थ कसोटीत खेळला होता आणि चांगली कामगिरी पण केली होती. मात्र, साइड स्ट्रेनच्या समस्येमुळे तो ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही आणि त्यामुळे स्कॉट बोलँडला संधी मिळाली. बोलँडने दोन्ही डावात मिळून 5 बळी घेतले. यादरम्यान त्याने भारताच्या पहिल्या डावात शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माला बाद केले होते. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांची शिकार केली. मात्र, आता हेझलवूडच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे.
हेजलवूडचे पुनरागमन भारतासाठी धोक्याचे संकेत
गाब्बा येथील ब्रिस्बेन कसोटी हे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आव्हान आहे. ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध भारताची फलंदाजी काही खास करू शकले नाहीत. आणि आता हेझलवूडच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा शस्त्रसाठा आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. हेझलवूडची एन्ट्री भारतीय फलंदाजांसाठी धाकधूक वाढवणारी आहे. विशेषत: जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या फॉर्ममध्ये नाहीत. हेझलवूड त्यांना त्रास देऊ शकतो.
ब्रिस्बेन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन - उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिच स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.