Dominance of Australia in Ashes : पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेची अॅशेस ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली आहे. चौथा कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे पाच सामन्याच्या अॅशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ ने विजय मिळवला आहे. गतवेळची अॅशेस ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियानेचं नाव कोरले होते. त्यामुळे आता अखेरचा कसोटी सामना इंग्लंडने जरी जिंकला तरी ट्रॉफी कांगारुंकडेच राहणार यावर शिक्कामोर्तब झालेय. बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडला अॅशेस मालिका गमावावी लागली आहे. चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची इंग्लंडकडे संधी होती, पण अखेरच्या पाचव्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे सामना ड्रॉ ठेवण्याचा निर्णय पंचांनी घेतला.


2017 पासून अॅशेस चषक आपल्याकडेच ठेवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलेय. मागील सहा वर्षांपासून इंग्लंड संघाच्या पदरी निराशाच पडली आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे 2023 मधील अॅशेस मालिकेतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा वरचष्मा होता आणि हा सामना शेवटपर्यंत खेळला असता तर इंग्लंड नक्कीच जिंकला असता. 5 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे. 






चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 317 धावा केल्या होत्या. मार्नस लबुशेन (51) आणि मिचेल मार्श (51) यांनी संघाकडून अर्धशतके झळकावली होती. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडने पहिल्या डावात ५९२ धावांची मजल मारली. यात जॅक क्रॉलीच्या 189 आणि जॉनी बेअरस्टोच्या 99* धावांचा समावेश आहे. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडने 275 धावांची आघाडी घेतली होती.





दुसऱ्या डावात लाबुशेनच्या (111) शतकामुळे ऑस्ट्रेलियाने 214/5 धावा केल्या होत्या. पण पावसाच्या व्यत्यामुळे चौथा आणि पाचवा दिवस धुवून निघाला. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसातील  पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे वाहून गेला. यानंतर दुसऱ्या सत्रात 30 षटकांचाच खेळ होऊ शकला नाही आणि त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दिवसाचे तिसरे सत्र पावसाने पूर्णपणे वाहून गेले. सामन्याच्या पाचव्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.