Australia Squad Champions Trophy 2025 सिडनी:ऑस्ट्रेलियानं आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. दुखापतग्रस्त पॅट कमिन्सला आराम दिला जाईल, अशा चर्चा सुरु असतानाच त्याच्याकडेच ऑस्ट्रेलिया ने पुन्हा नेतृत्त्व सोपवलं आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियानं डब्ल्यूटीसी, वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतही कमिन्सच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियानं भारतावर विजय मिळवला. पॅट कमिन्ससह जोस हेजलवूडनं देखील कमबॅक केलं आहे. स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्कसह मॅथ्यू शॉर्ट आणि अरोन हार्डी पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी खेळणार आहेत.
पॅट कमिन्स दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलियाच्या संघात बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सला दमदार गोलंदाजीच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या नॅथन एलिसला संघात स्थान दिलं आहे. कॅमेरुन ग्रीन दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये संघात असलेला शॉन एबट ला देखील संघात स्थान मिळालं नाही. पॅट कमिन्सच्या दुखापतीबाबत अपडेट नसली तरी त्याला कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दुखापतीमुळं पॅट कमिन्सला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्टला संधी मिळाली आहे. भारतात आयपीएल गाजवणाऱ्या पण ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग आणि वनडे सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या जॅक फ्रेज मॅकगर्कला संघाबाहेर पाठवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत एका गटात आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिली मॅच 22 फेब्रुवारीला होणार आहे. 25 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि 28 फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध मॅच होईल.
ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कॅप्टन), एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, अरोन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, एडम झाम्पा.
दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारताचे सामने दुबईत होणार आहेत. भारताचा संघ 17 ते 18 जानेवारीला जाहीर होण्याची शक्यता आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष भारतीय संघासमोर असेल. प्रशिक्षक गौतम गंभीरनं संघाचं प्रशिक्षक स्वीकारल्यानंतर बलाढ्य संघाविरोधात विजय मिळवता आलेला नाही. श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका, न्यूझीलंड विरुद्धची भारतातील कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजय भारतासाठी आवश्यक असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीवर भारताच्या पुढच्या वाटचालीचं चित्र स्पष्ट होईल.
इतर बातम्या :