Indian Cricket Team In ICC Test Rankings : बुधवारी आयसीसीने तीन वेळा कसोटी क्रमवारी जारी केली. दुपारी भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर गेल्याचं आयसीसीच्या रँकिंगमध्ये होतं. तर संध्याकाळ होईपर्यंत पुन्हा एकदा आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी करत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असल्याचं सांगितलं.
आयसीसीचा गोंधळ -
बुधवारी दुपारी दीड वाजता आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असल्याचं सांगितलं होतं. लगेच दोन मिनिटात टीम इंडिया क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अन् ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत होता. पण हा आनंद काही काळापुरताच मर्यादीत राहिला. कारण संध्याकाळी सात वाजता आयसीसीने पुन्हा कसोटी क्रमवारी जारी करत ऑस्ट्रेलिया नंबर एक टीम असल्याचं सांगितलं.
आयसीसीच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे क्रमवारीत बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे 126 रेटिंग गुण आहेत. तर भारतीय संघाचे 115 गुण आहे. टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. 120 धावांच्या खेळीचा फायदा रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत झाला आहे. रोहित शर्माने नवव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर कसोटी रोहित शर्माने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 120 धावांची खेळी केली होती. रोहित शर्मा सध्या 786 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे. तर ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर आहे. आर अश्विन गोलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
अश्विनही कसोटीत दुसऱ्या क्रमांकावर
आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडीच्या जाळ्यात कांगारु अडकले होते. रविंद्र जाडेजाने पहिल्या डावात तर अश्विन याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. या फिरकी जोडीनं दोन्ही डावात 15 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आता आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमावारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 846 गुणांसह अश्विन चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमात फक्त 21 गुणांचा फरक आहे.
आयसीसी रँकिंगमध्ये भारताचाच दबदबा -
टीम इडिया कसोटीत नंबर 2
वनडे मध्ये टीम इंडिया नंबर 1
टी 20 मध्ये नंबर 1 टीम इंडिया
टी 20 मध्ये अव्वल फलंदाज - सूर्यकुमार यादव
वनडेतील नंबर 1 गोलंदाज - मोहम्मद सिराज
कसोटीतील नंबर 1 अष्टपैलू - रविंद्र जाडेजा
कसोटीतील नंबर 2 अष्टपैलू खेळाडू - आर अश्विन
कसोटीती नंबर 2 गोलंदाज - आर अश्विन
टी 20 तील नंबर 2 अष्टपैलू - हार्दिक पांड्या