AUS vs ENG ICC Champions Trophy 2025 : मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाचे रणशिंग फुंकले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कांगारू संघाने इंग्लंड संघाच्या विक्रमी लक्ष्याचा एकतर्फी पाठलाग केला आणि काही तासांतच एक नवा इतिहास रचला. जोश इंग्लिश विजयाचा हिरो ठरला. त्याने तुफानी शतक ठोकून इंग्लंडला तारे दाखवले. इंग्लंडला हरवून ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठ्या धावसंख्येचा आणि सर्वात मोठ्या पाठलागाचा नवा इतिहास रचला आहे.

12 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा संपला दुष्काळ

2013 आणि 2017 मध्ये ऑस्ट्रेलियासारख्या नंबर-1 संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही विजय मिळवता आला नाही. पण यावेळी कांगारू संघाने संघातील स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कांगारू संघाचा फलंदाज जोश इंग्लिसने विजयाची कहाणी लिहिली. इंग्लिशच्या 120 धावांच्या खेळीसमोर बेन डकेटचे 135 धावाही फिके पडल्या.

इंग्लंडच्या आशा मिळाल्या धुळीस 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडसाठी सलामीवीर बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठी खेळी केली. त्याने 17 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 165 धावा केल्या. त्याच वेळी, जो रूटनेही 68 धावांची शानदार खेळी केली. या डावांच्या आधारे, संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावर नोंदवली. ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचा मोठा आकडा होता, जो इंग्लंडच्या विजयाचा पुरावा होता असे वाटत होते. पण जोश इंग्लिशने इंग्रजांना सळो की पळ करून सोडले.

ऑस्ट्रेलिया 5 विकेट्सनी जिंकला

डोंगरासारख्या लक्ष्याच्या दबावाखाली ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने केवळ 27 धावांच्या धावसंख्येत आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले, ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या विकेटचा समावेश होता. पण मॅथ्यू शॉर्टची 63 धावांची खेळी कांगारू संघासाठी उपयुक्त ठरली. यानंतर जोश इंग्लिशने संघाची सूत्रे हाती घेतली. लॅबुशेनने 47 आणि अ‍ॅलेक्स कॅरीने 69 धावा करून विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाने अनेक वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाची चव चाखली.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघाच्या एका डावातील सर्वोच्च धावा -

  • 356/5 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर, 2025
  • 351/8 - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, 2025
  • 347/4 - न्यूझीलंड विरुद्ध युएसए, 2004
  • 338/4 - पाकिस्तान विरुद्ध भारत, द ओव्हल, 2017
  • 331/7 - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कार्डिफ, 2013
  • 323/8 - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2009