Pakistan vs India ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत. हा ब्लॉकबस्टर सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी मोहम्मद रिझवानच्या संघावर खूप दबाव आहे. कारण कराची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा पराभव झाला. दुसरीकडे, भारताने स्पर्धेची सुरुवात दमदार केली. शुभमन गिलच्या शतक आणि मोहम्मद शमीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. सध्याच्या फॉर्मचा विचार करता, या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा आहे यात शंका नाही. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद हफिजने खळबळजनक वक्तव्य केले.  

'रमजानपर्यंत पाकिस्तान टिकला पाहिजे....'

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने रिझवानच्या संघाचा चांगलाच समाचार घेतला. संघाच्या खराब कामगिरीनंतर तो म्हणाला की, कर्णधाराने सामन्यादरम्यान अनेक चुकीचे निर्णय घेतले. जखमी फखर झमानला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात काही अर्थ नव्हता. याशिवाय, मोहम्मद हाफिजने सांगितले की माझ्या मित्राने मला विचारले होते, भाऊ, तुला काय वाटते, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या काय शक्यता आहेत?

त्याच्या मित्राच्या या प्रश्नावर हाफिज म्हणाला की, "जर पाकिस्तान रमजानच्या सुरुवातीपर्यंत टिकला तर शक्यता आहे."

हाफिजने असे का म्हटले? 

खरंतर, यावर्षी रमजान 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज विनोदाने असे म्हणण्याचा प्रयत्न करत होता की, पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळत आहे, फक्त देवच त्यांना वाचवू शकतो. म्हणूनच तो म्हणाला की पाकिस्तानने रमजानपर्यंत स्पर्धेत कसे तरी टिकून राहावे, त्यानंतर देव ते पुढे नेईल.

दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामना 

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान रमजानपर्यंत टिकेल की नाही, हे 23 फेब्रुवारीलाच ठरवले. कारण जर टीम इंडियाने दुबईमध्ये त्यांना पराभूत केले तर रिझवानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडेल. यानंतर, त्याला खरोखर देवाची आणि नशिबाची आवश्यकता असेल.

दुबईमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान सामन्याचा रेकॉर्ड सध्या यजमान संघाच्या बाजूने आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला 3 वेळा हरवले आहे, तर टीम इंडियाला फक्त दोनदाच विजय मिळवता आला आहे. पण जेव्हा दुबईमध्ये खेळण्याचा विचार येतो तेव्हा येथे टीम इंडियाचा वरचष्मा असतो. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दोन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामने भारताने सहज जिंकले आहेत. 2018 नंतर पहिल्यांदाच या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा -

Shoaib Akhtar on Abhishek Sharma : रावळपिंडी एक्स्प्रेस सुद्धा अभिषेक शर्माच्या प्रेमात! थेट दुबईमधील हॉटेलामध्ये गाठलं अन् म्हणाला...