World Cup Points Table : विश्वचषक जसाजसा उत्तरार्धाकडे झुकतोय, तसातसा सेमीफायनलची स्पर्धा अधिक रंजक होत चालली आहे. वानखेडेवर लंकादहन करत भारताने सेमीफायनलचे तिकिट मिळवले होते. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकाही उपांत्य फेरीत पोहचली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचे तिकिट मिळाले आहे. आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ईडन गार्डन्सवर सामना होणार आहे. या सामन्याआधीच आफ्रिकेच्या संघाला गुड न्यूज मिळाली आहे. त्यामुळे भारताविरोधात उतरण्याआधी आफ्रिकेचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. इंग्लंड आणि बांगलादेश यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. ऑस्ट्रेलियाचेही सेमीफायनलचे तिकिट जवळपास निश्चित मानले जातेय. चौथ्या स्थानासाठी मात्र लढाई सुरु आहे. त्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन संघामध्ये मोठी स्पर्धा असेल. त्याशिवाय श्रीलंका आणि नेदरलँड्स यांनाही संधी आहे. 


चौथ्या स्थानासाठी रंगत वाढली -  


सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी चौथा संघ कोणता... याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चौथ्या स्थानासाठी रोमांचक स्पर्धा सुरु आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघाचे प्रत्येकी 8-8 गुण आहेत. पण सरस नेटरनरेटमुळे न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पण अफगाणिस्तानचे दोन सामने अद्याप शिल्लक आहेत. तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा प्रत्येकी एक एक सामना बाकी आहे. त्यामुळे अफगाणिस्तान मोठा उलटफेर करु शकतो. 


गुणतालिकेत कोणता संघ कुठे ...


भारतीय संघ 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि आफ्रिका संघ सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ सात सामन्यात 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +0.924 इतका आहे.चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. त्यांचे आठ सामन्यात आठ गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट +0.398 इतका आहे. पाकिस्तान आठ सामन्यात आठ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट +0.036 इतका आहे. सहाव्या स्थानावर असणाऱ्या अफगाणिस्तान संघाने सात सामन्यात आठ गुणांची कमाई केली आहे. त्यांचा रनरेट -0.330 इतका आहे. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघापेक्षा एक सामना कमी खेळलाय.  


इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात


ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाचा सामना केल्यानंतर इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. इंग्लंड आणि बांगलादेश यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. सातव्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीलंकेचे सात सामन्यात चार गुण आहेत. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या नेदरलँड्सचेही सात सामन्यात चार गुण आहेत. इंग्लंड आणि बांगलादेश या संघाना सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागलाय.