कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) आज विश्वचषक स्पर्धेतील (ICC World Cup 2023) सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेले दोन संघ भिडतायत. सलग सात सामने जिंकणाऱ्या रोहितसेनेची (Team India) गाठ पडतेय सहा सामने जिंकलेल्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी (South Africa). दोन्ही संघांची सध्याची लय आणि ताकद पाहता मुकाबला तगडा होणार असंच सध्यातरी दिसतंय.
भारताने सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. आफ्रिकन आर्मीचंही ते कन्फर्म झाल्यात जमा आहे. दोन्ही संघ दोन्ही आघाड्यांवर म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत सरस कामगिरी करतायत. दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामने पहिली बॅटिंग करुन जिंकलेत. एकच सामना त्यांनी धावांचा पाठलाग करुन जिंकलाय तो पाकिस्तानचा. तिथे मात्र त्यांचा घामटा निघालेला. चुरशीच्या लढतीत त्यांनी एका विकेटनी बाजी मारलेली. तर, नवख्या पण चिवट नेदरलँड्ससोबतच्या सामन्यात त्यांना 43 षटकांत 246 धावांचं लक्ष्य झेपलं नव्हतं. ही बाब लक्षात ठेवूनच आपण टॉस जिंकला तर, कदाचित रोहित शर्मा पहिली फलंदाजी करुन त्यांच्यासमोर लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करु शकतो. अर्थात दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात रबाडा, एनगिडी, डावखुरा यानसेन अशी अस्त्र आहेत. जी तगड्या भारतीय फलंदाजीची परीक्षा घेऊ शकतात.तर, त्यांची फलंदाजीही सुसाट चाललीय. डी कॉकच्या नावावर चार शतकं लागलीत. मारक्राम, मिलर, वॅन डर डुसे, क्लासेन हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसं काढतायत.
एक मात्र नक्की की या सामन्यात त्यांची गाठ तितक्याच भन्नाट फॉर्मात असणाऱ्या भारतीय चौकडीशी असणार आहे. या स्पर्धेत आपली गोलंदाजी ताकदवान आणि धारदार परफॉर्म करतेय. विजयाचं तोरण लावण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरलीय. किंबहुना या वर्ल्डकपचे आपले हीरो फलंदाजांइतकेच हे गोलंदाजही आहेत. कारण, आपण सातपैकी सहा सामने जे धावांचा पाठलाग करुन जिंकलेत. त्या जवळपास प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीचं पेकाट या आपल्या चार शस्त्रांनी मोडून टाकलंय. वसिम अक्रम, शोएब अख्तरसारख्या नावाजलेल्या फास्ट बॉलर्सनी तर शमी अँड कंपनीचं तोंड भरुन कौतुक केलंय. आपल्या गोलंदाजीची दहशत वाटावी अशी त्यांची कामगिरीची आकडेवारीच सांगतेय. ऑस्ट्रेलियाला 27 षटकांत दोन बाद 110 वरुन 49.3 षटकांत सर्वबाद 199, पाकिस्तानला 29.3 षटकांत दोन बाद 155 वरुन 42.3 षटकांत सर्वबाद 191, न्यूझीलंडला 36 षटकांत तीन बाद 205 वरुन 50 षटकांत सर्वबाद 273 असे ब्रेक लावण्याची किमया आपल्या गोलंदाजांनी करुन दाखवलीय. इतकंच नव्हे तर इंग्लंडविरुद्धचा 229 चा माफक स्कोर डीफेंड करताना आपण त्यांना 129 वरच उखडून टाकलं. तर, वानखेडेवर 358 चं महाकाय लक्ष्य गाठणाऱ्या श्रीलंकेची आधी 29 ला 8 आणि नंतर 19.4 षटकांत सर्वबाद 55 अशी आपण केविलवाणी स्थिती केली. बुमराचं वैविध्य, अचूकता, सिराजचा वेग आणि उसळी यामुळे भल्याभल्यांची भंबेरी उडतेय. त्यात पहिले चार सामने संघाबाहेर राहावं लागलेल्या शमीने नंतरच्या तीन सामन्यांत 14 विकेट्सनी आपली पोतडी भरुन टाकलीय. त्याचा वेग, टप्पा आणि सीम मूव्हमेंटनी दिग्गज फलंदाजांना नामोहरम केलंय (बेन स्टोक्सची विकेट आठवा). भारतीय फास्ट बॉलर्स वेगवान खेळपट्टीचं बाळकडू घेऊन मोठं झालेल्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडतायत, ही भावना मनाला प्रचंड सुखावणारी आहे.
हे वेगवान त्रिकूट कमाल करत आहेच, त्याच वेळी कुलदीप आणि जडेजाचा फिरकी सापळाही प्रतिस्पर्ध्यांना अडकवतोय. काही अपवाद वगळता क्षेत्ररक्षणही चांगली साथ देतेय. सगळं काही लयीत सुरु आहे, प्रतीक्षा आता फक्त चार सामने जिंकण्याची आहे. फलंदाजांची भट्टीही कमाल जमलीय. सलामीवीर रोहित-गिल, आजचा बर्थ-डे बॉय कोहली, राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव प्रत्येकाच्या बॅटमधून धावांचं सकस पीक आलंय. त्यात श्रेयस अय्यर गेल्या काही सामन्यांमध्ये विकेट बहाल करत होता. वानखेडेवर लंकेविरुद्ध त्याने या काही सामन्यांचं रितेपण धुवून काढलं. त्याने श्रीलंकेची गोलंदाजी वानखेडेवर वाळत घातली. त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. त्यात पंड्या स्पर्धेतील यापुढच्या सामन्यांमध्ये संघात नसणार आहे. त्यामुळे जडेजासह गोलंदाजांचा क्रम सातव्या नंबरपासूनच सुरु होणार आहे. ही बाब लक्षात घेता सहा अव्वल फलंदाजांनीच धावांची पालखी वाहायला हवी. त्यासाठी गोलंदाजांना या पालखीचे भोई व्हायला लागू नये, अशीच अपेक्षा करुया.
एकीकडे भारत, दक्षिण आफ्रिका सेमी फायनलकडे लक्ष ठेवून असतानाच अन्य चार टीम्स म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यातले दोघे तीन आणि चार नंबर पटकावतील असं सध्याचं तरी चित्र आहे. त्यात नेट रन रेट आणि पॉईंट्स दोन्हीचा विचार केल्यास जास्त चान्स ऑस्ट्रेलिया आणि किवींना आहे. तरी क्रिकेट हा अनपेक्षिततेचा खेळ आहे. त्यात आतापर्यंतच्या सामन्यांच्या निकालांची आकडेवारी मोठी इंटरेस्टिंग आहे. पहिले दोन सामने गमावणाऱ्या ऑसी टीमने सलग पाच सामने जिंकलेत. शनिवारी इंग्लंडविरुद्धची लढाईही त्यांनी झुंजार वृत्तीच्या बळावर जिंकली. दुसरीकडे किवी टीमने सलग चार सामने जिंकल्यावर सलग चार सामन्यात पराभवाची चव चाखलीय. पाकविरुद्धच्या कालच्या सामन्यात 401 चा महाकाय टप्पा गाठून त्यांच्या भाळी विजयाचा टिळा लागला नाही. फखर जमान आणि पाऊस त्यांच्या वाटेतले काटे ठरले. फखर जमान आणि पावसाच्या कामगिरीमुळे पाकच्या स्पर्धेतल्या आव्हानातली धुगधुगी कायम राहिल्यासारखी वाटतेय. दुसरीकडे अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्सचे किल्ले सर केलेत. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजीही बहरात आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे अवघड पेपर सोडवायचेत. पेपर कठीण असले तरी अफगाणी विद्यार्थी मेहनती आणि अभ्यासू आहेत. त्यामुळे यातल्या एखाद्या पेपरमध्ये त्यांनी प्रश्न नीट सोडवले आणि गुण मिळवले तर, सेमी फायनलच्या रेसमध्ये आणखी रंग भरले जाऊ शकतात. वर्ल्डकपचे शेवटचे दोन आठवडे उऱलेत. दिवाळी जवळ येतेय, तेव्हा कोण फटाके वाजवतंय आणि कोण फटके खातंय हे पाहणं रंजक ठरणार आहे.