Australia beat England 8 Wickets 1st Test : अॅशेस मालिकेतील पहिलीच कसोटीत पहिल्या सत्रापासून सुरू झालेला विकेट्स पडण्याचा सिलसिला थेट दीड दिवसात सामन्याचा शेवट करून गेला. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील धोकादायक खेळपट्टीने इंग्लंडला अक्षरशः गुडघ्यावर आणलं आणि ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने धडाकेबाज विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या एकूण 19 विकेट्स पडल्या आणि दुसऱ्या दिवशीही हा कहर थांबला नाही. अर्ध्या दिवसाच्या खेळातच 11 विकेट्स पडल्या. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 164 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे लक्ष्य झाले. या खेळपट्टीच्या परिस्थिती पाहता अजिबात सोपे नव्हते, पण ट्रॅव्हिस हेडने फक्त 69 चेंडूत तुफानी शतक ठोकून सामना ऑस्ट्रेलियाच्या खिशात टाकला.
पर्थची खेळपट्टी इंग्लंडसाठी ठरली कर्दनकाळ, ट्रॅव्हिस हेडची तुफानी खेळी
इंग्लंडने दिलेले 205 धावांचे लक्ष्य पहिल्या तीन डावांच्या परिस्थितीनुसार भल्यामोठे वाटणारे होते. पिचवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आणि सतत पडणाऱ्या विकेट्स पाहता इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता. पण ट्रेविस हेडने इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः धू-धू धुतले. ट्रेविस हेडने एकहाती सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने खेचत 83 चेंडूत 123 धावांची ऐतिहासिक वादळी खेळी साकारली. यामध्ये 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हेडने केवळ 69 चेंडूत शतक ठोकत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून चौथे वेगवान शतक ठोकले. मार्नस लाबुशेनने 51 धावांची अर्धशतकी खेळी करून हेडला उत्तम साथ दिली.
इंग्लंडने हातची संधी गमावली
इंग्लंडने पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियाला फक्त 132 धावांवर गारद करत इंग्लंडने 40 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने ही आघाडी वाढवत ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे आव्हान ठेवले. पिच पाहता हे लक्ष्य कठीण नाही तर अतिशय कठीण वाटत होते. पण चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने आक्रमक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो 100 टक्के यशस्वी ठरला.
गोलंदाजीत मिचेल स्टार्कचा कहर
गोलंदाजीत मिचेल स्टार्कने कहर करत या सामन्यात तब्बल 10 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 3 असे स्टार्कचे आकडे राहिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या, पण त्याची मेहनत इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा -