ICC Men's T20 World Cup 2026 All 20 Teams 4 Groups : टी20 वर्ल्ड कप 2026 साठीच्या ग्रुपची रूपरेषा जवळपास अंतिम झाली आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून प्रत्येक ग्रुपमध्ये 5 संघ अशा चार ग्रुपमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. आयसीसीकडून यावर अधिकृत शिक्का बसणे बाकी असले तरी ग्रुप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. यजमान भारताला तुलनेने सोपा ग्रुप मिळाल्याचे दिसत आहे, तर सह-यजमान श्रीलंका थोड्या कठीण ग्रुपमध्ये जाण्याची शक्यता आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना किमान एकदा तरी होणार हे निश्चित आहे.

Continues below advertisement


भारत-श्रीलंका संयुक्त मेजबानी


टी20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका मिळून करणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीला होणार असून 8 मार्चला अंतिम सामना खेळला जाईल. भारताचा पहिला सामना गतविजेते म्हणून 8 फेब्रुवारी रोजी यूएसएविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होण्याची शक्यता आहे.


भारत आणि पाकिस्तान एकाच गटात


क्रिकबझच्या मते, यावर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होतील. यावेळी, भारताच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. शिवाय, भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये खेळला जाण्याची अपेक्षा आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध असेल, जो 8 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाऊ शकतो, तर भारतीय संघ 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध खेळेल. 15 फेब्रुवारी रोजी भारताचा कोलंबोमध्ये पाकिस्तानशी सामना होईल, तर 18 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाचा मुंबईत नेदरलँड्सशी सामना होईल.


'या' शहरांमध्ये सामने खेळवले जातील


भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे सामने होतील, तर श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी येथे टी-20 वर्ल्ड कप सामने होतील. जर पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम अंतिम सामन्याची मेजबानी करेल. कोलंबोला एका सेमीफायनलसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे, पण त्यासाठी पाकिस्तान किंवा श्रीलंका यांपैकी एखाद्या संघाने किमान उपांत्य फेरी गाठणे आवश्यक आहे.


भारताचे लीग सामने (संभाव्य वेळापत्रक)



  • 8 फेब्रुवारी – भारत vs यूएसए, अहमदाबाद

  • 12 फेब्रुवारी – भारत vs नामिबिया, दिल्ली

  • 15 फेब्रुवारी – भारत vs पाकिस्तान, कोलंबो

  • 18 फेब्रुवारी – भारत vs नेदरलँड्स, मुंबई


2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सर्व चार ग्रुप (संभाव्य)



  • ग्रुप 1 - भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स.

  • ग्रुप 2 - ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.

  • ग्रुप 3 - इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ.

  • ग्रुप 4 - दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा.