AUS vs SL 1st Innings Highlights:  वादळी सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाने अवघ्या 209 धावांत रोखले आहे. श्रीलंकेचे 9 फलंदाज फक्त 52 धावांत तंबूत परतले. त्यामुळे श्रीलंकेचा संपूर्ण डाव 43.3 षटकांत 209 धावांत संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून एडम जम्पा याने 4 विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. विश्वचषकातील पहिल्या विजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे 210 धावांचे आव्हान आहे. दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्या विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 209 धावां करण्यापासून रोखायचं आहे. 


श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर निसंका आणि कुसर परेरा यांनी वादळी सुरुवात केली. स्टार्क, स्टार्क, हेजलवूड यासारख्या गोलंदाजांचा त्यांनी शानदार सामना केला. निसंका आणि परेरा यांनी श्रीलंकेसाठी शतकी सलामी दिली. श्रीलंकेचा संघ 300 धावांच्या पुढे जाणार असे वाटले होते. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने श्रीलंकेच्या दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले. तिथूनच श्रीलंकेची वाताहत झाली. 


निसंका आणि परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 21.4 षटकांमध्ये 125 धावांची सलामी दिली. निसंका याने 67 चेंडूमध्ये 61 धावांची दमदार खेळी केली. यामध्ये आठ चौकारांचा समावेश होता. निसंका तंबूत परतल्यानंतर कुसल परेराही फार काळ टिकू शकला नाही. 78 धावांवर परेरा बाद झाला. परेराने 82 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. परेरा बाद झाल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी कोलमडली. एकापाठोपाठ एक तंबूत परतले. चिरिथ असलंका याने अखेरपर्यंत लढा दिला. त्याने 39 चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलंडता आली नाही. 


ये रे माझ्या मागल्या प्रमाणे श्रीलंकेने विकेट फेकल्या. कर्णधार कुसल मेंडल 9 धावांवर बाद झाला. सदिरा समरविक्रमा याला आठ धावा करता आल्या. धनंय डिसल्वा याला सात धावांचे योगदान देता आले. दुनिथा वेलालागे दोन धावांवर धावबाद झाला. चमिका करुनारत्ने दोन, महिश तिक्ष्णा शून्य, लहुरु कुमारा चार धावांवर बाद झाला. 



ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सुरुवातीला विकेट मिळाली नाही. पण त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक लंकेच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मिचेल स्टार्कने 10 षटकात 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. ग्लेन मॅक्सवेल याला एक विकेट मिळाली. अॅडम झम्पा याने शानदार गोलंदाजी केली. झम्पाने 8 षटकात 47 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मार्कस स्टॉयनिस आणि जोश हेजलवूड यांना एकही विकेट घेता आली नाही.