David warner's Century : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने नेदरलँडची गोलंदाजी फोडून काढली. वॉर्नरने यंदाच्या विश्वचषकातील विक्रमी दुसरे शतक ठोकले. वॉर्नरचे विश्वचषकातील हे सहावे शतक होय. या शतकासह डेविड वॉर्नरने सचिनच्या शतकांची बरोबरी केली. वॉर्नर आणि मॅक्सवेलच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 399 धावांचा डोंगर उभारला. वॉर्नरने नेदरलँडची गोलंदाजांचा समाचार घेतला. वॉर्नरे 93 चेंडूत 104 धावा चोपल्या. शतकानंतर डेविड वॉर्नरने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले. वॉर्नरच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 














डेविड वॉर्नरने पहिल्या चेंडूपासूनच नेदरलँडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. वॉर्नरने स्मिथच्या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव संभाळला. वॉर्नरने तीन षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने शतक ठोकले. वॉर्नरचे हे विश्वचषकातील सहावे शतक होय. वॉर्नरने विश्वचषकातील 23 व्या डावात सहावे शतक ठोकले. त्याने सचिनच्या शतकांचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकरने 44 डावांत सहा शतके ठोकली होती. विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने 22 डावात सात शतके ठोकली आहेत. आता वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर सचिन तेंडुलकर सहा शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा कुमार संगाकारा याने 35 डावात पाच शतके ठोकली आहेत. तो चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या रिकी पाँटिंगने 42 डावात 5 शतके लगावली आहेत. 






मॅक्सवेलचं वादळी शतक - 


ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. नेदरलँड्सविरुद्ध दिल्लीतल्या सामन्यात मॅक्सवेलनं अवघ्या 40 चेंडूंत शतक झळकावलं. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमच्या नावावरचा 49 चेंडूंमधल्या शतकाचा विक्रम मोडीत काढला. मारक्रमनं याच विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 49 चेंडूंत शतक साजरं करण्याची कामगिरी बजावली होती. दरम्यान, मॅक्सवेलनं नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 44 चेंडूंत 106 आणि डेव्हिड वॉर्नरनं 93 चेंडूंत 104 धावांची खेळी उभारली. मॅक्सवेलच्या शतकी खेळीला नऊ चौकार आणि आठ षटकारांचा साज होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत आठ बाद 399 धावांचा डोंगर उभारला.