ENG Tour of Australia: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs ENG) यांच्यात आज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. अॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं सहा विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला 287 धावांवर रोखत ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर अॅश्टन अगरनं (Ashton Agar) डीप मिड-विकेट दिशेला फिल्डिंग करताना जबरदस्त षटकार रोखला. अॅश्टनची फिल्डिंग पाहून मैदानातील खेळाडू आणि पंचांसह प्रेक्षकही हैराण झाले. सोशल मीडियावर अॅश्टन अगरच्या फिल्डिंगचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
दरम्यान, पहिल्या डावातील 45व्या षटकात इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलाननं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीट कमिन्सचा फटका मारला. चेंडू मिड-विकेटवर दिशेनं गेला, जिथे अॅश्टन अगर फिल्डिंग करत होता. सुरुवातीला असं वाटलं की चेंडू सहज सीमारेषेबाहेर जाईल आणि इंग्लंडच्या खात्यात 6 धावा जमा होतील. पण चेंडू सीमारेषेपर्यंत जाऊ नये म्हणून अॅश्टननं जोरदार प्रयत्न केले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अॅश्टननं कशाप्रकारे चेंडू सीमारेषेपलीकडं जाण्यापासून रोखला.
अॅश्टन अगरच्या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडिओ-
मलानची शतकीय खेळी व्यर्थ
या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघानं 50 षटकांत 9 गडी गमावून 287 धावा केल्या. इंग्लंडकडून डेव्हिड मलाननं महत्वाची खेळी केली. त्यानं 128 चेंडूत 134 धावांचं योगदान दिलं. त्याच्या खेळीत एकूण 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. मालनच्या या खेळीमुळं संघाला सन्मानजनक धावसंख्या फलकावर लावण्यात यश आलं. प्रत्युत्तरात डेविड वार्नर, ट्रेविस हेड, स्टीव स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघानं सहा विकेट्सनं इंग्लंडचा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी (19 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. तर, या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 22 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
हे देखील वाचा-