Asia Cup 2025 IND vs PAK : आशिया कप 2025 मधील सर्वात रोमांचक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केले. हा भारताचा सलग दुसरा विजय असून यामुळे टीम इंडिया सुपर-4 मध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मात्र, या विजय मिळूनही टीम इंडियाला गुणतालिकेत थोडा फटका बसला आहे.
गुणतालिकेत भारताला बसला फटका
ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई या संघांचा समावेश आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 4 गुण मिळवले असून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. पण नेट रन रेट (NRR) मध्ये मात्र घसरण झाली आहे. यूएईविरुद्ध भारताने पॉवरप्लेतच सामना संपवला होता, त्यावेळी भारताचा नेट रन रेट तब्बल 10.483 इतका होता. परंतु पाकिस्तानविरुद्ध 128 धावांचे लक्ष्य 15.5 षटकांत पूर्ण करताना भारताचा नेट रन रेट घसरून 4.793 वर आला आहे. जर भारताने लवकर सामना जिंकला असता, तर त्यांचा नेट रन रेट अजून चांगला झाला असता.
पाकिस्तानलाही तोटा
पाकिस्तानला या स्पर्धेत भारताकडून पहिला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तो ग्रुप-ए मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन सामन्यांत त्याच्या खात्यात 2 गुण जमा झाले असले, तरी या पराभवामुळे त्याच्या नेट रन रेटवर परिणाम झाला आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट आधी 4.650 होता, जो आता कमी होऊन फक्त 1.649 इतकाच झाला आहे. दुसरीकडे ओमान आणि यूएई या संघांनी आपापले सुरूवातीचे सामने गमावले असून त्यांच्या नावावर अजूनही शून्य गुण आहेत.
ग्रुप-बी मध्ये अफगाणिस्तान आघाडीवर
ग्रुप-बी कडे पाहिल्यास अफगाणिस्तानने आपला पहिला सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत आणि 4.700 असा नेट रन रेट ठेवत अव्वल स्थान मिळवले आहे. श्रीलंकेनेही एक सामना जिंकला आहे आणि तिच्या नावावर 2 गुण आहेत, पण नेट रन रेट 2.595 असल्याने ती दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेश आणि हॉन्गकॉन्ग या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांचे खाते अद्याप रिकामे आहे.
सुपर-4 चं चित्र
ग्रुप-ए मध्ये भारताच्या सलग दोन विजयांमुळे त्याने सुपर-4 ची दारं जवळजवळ उघडली आहेत. पाकिस्तानला पुढे जायचे असल्यास उरलेले सामने जिंकावे लागतील. ग्रुप-बी मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ सध्या सर्वात मजबूत दावेदार म्हणून समोर आले आहेत.
हे ही वाचा -