कोलंबो : आशिया कपच्या 2023 (Asia Cup 2023) अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी आज श्रीलंका आणि पाकिस्तान (SL vs PAK) संघ आमने-सामने आहेत. सुपर-4 मध्ये आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) सामना पाहायला मिळत आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमधील प्रेमदासा क्रिकेट स्टेडिअममध्ये हा रणसंग्राम सुरु आहे. या दोन्हीमधील विजेता संघ फायनलमध्ये भारतासमोर उभा ठाकणार आहे. दरम्यान, आतापर्यंतचं एकंदर समीकरण पाहता श्रीलंका संघाने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत स्थान जवळपास निश्चित केलं आहे. ते नेमकं कसं यासाठी आशिया चषक 2023 पॉईंट्स टेबलचं समीकरण जाणून घ्या.
श्रीलंकेचं अंतिम फेरीत स्थान जवळपास निश्चित
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पावसाचं संकट अद्यापही घोंघावत आहे. कोलंबोमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना आता सुरु झाला असला तरी, अद्यापही पावसाची शक्यता आहे. आधीच पावसामुळे या सामन्यातील षटकं कमी करण्यात आली आहेत. आजचा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल. आजचा सामना वॉशआऊट झाल्यास
श्रीलंका संघाला याचा फायदा होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यासाठी राखीव दिवस?
याआधी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. पण, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाला किमान 20 षटकांचा सामना खेळणं अनिवार्य आहे. पावसामुळे सामना वॉशआऊट झाला तर, श्रीलंका संघासाठी हे फायनलचं तिकीट ठरेल.
सामना वॉशआऊट झाल्यास काय होईल?
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना वॉशआऊट झाल्यास जास्त रन रेट असणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. याचा फायदा श्रीलंका संघाला होईल. कारण, श्रीलंका संघाचा रन रेट पाकिस्तान संघापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास श्रीलंका फायनलमध्ये पोहोचेल आणि पाकिस्तान आशिय कपच्या शर्यतीतून बाहेर पडेल. आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये रंगणार आहे.
पाकिस्तान संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कोणता पर्याय?
सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघाकडे प्रत्येकी 2-2 गुण आहे. पण, जास्त रन रेटमुळे श्रीलंका पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान खराब रनरेटमुळे मागे आहे. श्रीलंकेचा नेट रन रेट -0.200 तर श्रीलंकेचा नेट रन रेट -1.892 आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं हा एकमेव पर्याय आहे.
संबंधित इतर बातम्या :