नवी दिल्ली :भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून अपोलो टायर्सची निवड झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानं देण्यात आलं आहे. अपोलो टायर्सकडून  प्रतिमॅच 4.5 कोटी रुपये दिले जाऊ शकतात अशी माहिती आहे.यापूर्वी ड्रीम 11 कडून प्रत्येक मॅचसाठी बीसीसीआयला 4 कोटी रुपये दिले जायचे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार Canva आणि JK Tyres ने देखील  टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरशिपसाठी बोली लावली होती. बिर्ला ओप्टस पेंटस देखील शर्यतीत होतं. मात्र, त्यांनी बोली लावली नाही. स्पॉन्सरशिपसाठी बोली 16 सप्टेंबर म्हणजे आज लावली गेली. बीसीसीआयनं 2 सप्टेंबरला लीड स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्यासाठी कंपन्यांना आमंत्रित केलं होतं. बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो, तंबाखू कंपन्यांना बोली लावण्यास मनाई करण्यात आली होती. 

आशिया कपमध्ये टीम इंडिया लीड स्पॉन्सरशिवाय खेळत आहे. जर अपोलो टायर्स सोबत डील फायनल झाली तर वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत भारतीय संघ Apollo Tyres नावाची जर्सी घालून मैदानात उतरलेली पाहायला मिळू शकते.  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी 2 ऑक्टोबरला अहमदाबाद तर दुसरी कसोटी 10 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवली जाईल. 

भारत सरकारनं ऑनलाईन गेमिंग संदर्भातील नवा कायदा मंजूर केल्यानंतर ड्रीम 11 नं बीसीसीआय सोबतचा करार संपवला होता. त्यामुळं बीसीसीआयला नवा लीड स्पॉन्सर शोधावा लागला.

दरम्यान, अपोलो टायर्स  इतर टीमसोबत जोडलेली आहे. प्रामुख्यानं फुटबॉल क्लबला ते स्पॉन्सर करतात.मँचेस्टर यूनायटेड, चेन्नेन एएफसी आणि इंडियन सुपर लीग सोबत अपोलो टायर्सचे करार आहेत. शेअर बाजारात अपोलो टायर्स कंपनीचा शेअर 487 रुपयांवर पोहोचला आहे. आज शेअर बाजारात या कंपनीचा स्टॉक 7.80 रुपयांनी वाढला आहे.