मुंबई : भारताचा कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळतोय. मुंबई आणि छत्तीसगड यांच्यात बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकॅडमी येथे सामना सुरु आहे. या मॅचमध्ये अजिंक्य रहाणे यानं 159 धावांची खेळी केली. ही खेळ करत अजिंक्य रहाणे यानं वय हा फक्त क्रमांक असतो अनुभव महत्त्वाचा असतो, हे दाखवून दिलं आहे.
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्यावृत्तानुसार अजिंक्य रहाणे यानं हा फक्त वयाचा नाही तर इंटेंटचा मुद्दा आहे, असं म्हटलं. रेड बॉल क्रिकेट संदर्भातील पॅशन आणि तुम्ही मैदानावर किती कठोर मेहनत करता हे महत्त्वाचं असल्याचं त्यानं म्हटलं.
अजिंक्य रहाणेकडून माईक हस्सीचं उदाहरण
वयाच्या मुद्द्यावर भाष्य करताना अजिंक्य रहाणे यानं ऑस्ट्रेलियाच्या माईक हस्सीचं उदाहरण दिलं. माईक हस्सीनं ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात वयाच्या 30 व्या वर्षी पदार्पण केलं. तो अजूही धावा करतो. रेड बॉल क्रिकेटमध्ये अनुभव महत्त्वाचा असतो. मी विचार करतो, व्यक्तिगतपणे मला असं वाटतं की टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात (बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत) माझी गरज होती, असं अजिंक्य रहाणे यानं म्हटलं. अजिंक्य रहाणे यानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 42 व्या शतकाची नोंद केली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत अजिंक्य रहाणेनं भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली होती. अजिंक्य रहाणे म्हणाला की 34-35 वर्षानंतर खेळाडू चांगली कामगिरी करण्यावर लक्ष देतात. खेळाडू त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. जर एखादा रेड बॉल क्रिकेट संदर्भात पॅशिनेट असेल तर त्याच्याकडे निवड समितीनं लक्ष देण्याची गरज आहे, असं वाटत असल्याचं रहाणेनं म्हटलं. प्रत्येक वेळी कामगिरीच नाही तर इंटेंट आणि पॅशन आणि रेड बॉल क्रिकेट कसं खेळतात हे पाहावं, असं अजिंक्य रहाणेनं म्हटलं.
अजिंक्य रहाणे पुढं म्हणाला की मला वाटतं की माझ्या सारख्या अनुभवी खेळाडूंना अधिक संधी मिळायला हव्या. मात्र कोणतंही कम्युनिकेशन झालेलं नाही. मी फक्त नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतो, जे आता करत आहे. मात्र, यापूर्वी म्हटल्याप्रमाणं भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, मी त्यासाठी तयार होतो, असं अजिंक्य रहाणे यानं म्हटलं.
अजिंक्य रहाणे यानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीचा उल्लेख देखील केला. जेव्हा तुमच्याकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली असतात, ज्यांनी भारतासाठी वनडे-टी 20 मध्ये अनेकदा विजय मिळवून दिलेला आहे. तुम्हाला संघात अनुभव आवश्यक असतो, तुम्ही नव्या खेळाडूंसह मैदानात उतरु शकत नाही.तरुण रक्त महत्त्वाचं आहे पण अनुभव असल्यास संघ चांगली कामगिरी करतो, विशेषत : कसोटी क्रिकेटमध्ये असं अजिंक्य रहाणे यानं म्हटलं. रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलियातील शतकाबद्दल अजिंक्य रहाणेनं आंनद व्यक्त केला.