IND vs IRE 3rd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यातील अखेरचा टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तीन सामन्याची मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे. आयर्लंडमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात भारताने बाजी मारली होती. आयर्लंडलाही एकही सामना जिंकता आला नाही.
भारतासाठी या मालिकेत अनेक सकारात्मक बाबी झाल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहचे दमदार कमबॅक होय. याशिवाय भारताने या मालिकेत रिंकू सिंगसारख्या उदयोन्मुख खेळाडूला संधी दिली. रिंकू सिंह याने दुसऱ्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. प्रसिद्ध कृष्णाच्या पुनरागमनामुळे भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमणही मजबूत झाले. आता भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया कपच्या सामन्यात थेट मैदानात उतरणार आहे.
आयर्लंडविरोधात गोलंदाजांची कामगिरी कशी राहिली ?
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने दमदार कमबॅक केले. बुमराहने दोन सामन्यात आयर्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मालिकेतील दमदार कामगिरीमुळे जसप्रीत बुमराह याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा याचेही पुनरागमन दमदार झाले. प्रसिद्ध कृष्णा यानेही दोन सामन्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय रवि बिश्नोई याने भेदक मारा केला. बिश्नोईने आपल्या फिरकीमध्ये आयरिश खेळाडूंना अडकवले. रवि बिश्नोई याने दोन सामन्यात चार विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंह याने दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या. वॉशिंगटन सुंदर आणि शिवम दुबे यांना एकही विकेट मिळाली नाही.
फलंदाजांची कामगिरी कशी राहिली -
पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे भारताची फलंदाजी फक्त 6.5 षटकांची झाली होती. यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनाच संधी मिळाली होती. यशस्वीने पहिल्या डावात 24 तर दुसऱ्या सामन्यात 18 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने दुसऱ्या सामन्यात 58 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर पहिल्या डावात नाबाद 18 धावांचे योगदान दिले होते. संजूने दुसऱ्या सामन्यात 40 धावा चोपल्या होत्या. रिंकू सिंह याने दुसऱ्या सामन्यात 21 चेंडूत 38 धावांचा पाऊस पाडला होता. तिलक वर्माला दोन्ही सामन्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला तर दुसऱ्या सामन्यात फक्त एक धाव काढता आली. शिवम दुबे याने दुसऱ्या सामन्यात 22 धावा जोडल्या होत्या.