IND vs NZ in Wellington T20Is: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (18 नोव्हेंबर 2022) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्टेडियमवर भारताचं रेकॉर्ड अतिशय खराब आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन सामने भारतानं गमावले आहेत. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. 


पहिला सामना: भारताचा पाच विकेट्सनं पराभव (फेब्रुवारी, 2009)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 27 फेब्रुवारी 2009 रोजी वेलिंग्टन येथे पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ 149 धावा करू शकला. भारताकडून युवराज सिंहनं 34 चेंडूत 50 धावांची उत्कृष्ट खेळी केली. प्रत्युत्तरात ब्रेंडन मॅक्युलमच्या 55 ​​चेंडूत 69 धावांच्या नाबाद खेळीमुळं न्यूझीलंडनं पाच विकेट्सनं हा सामना जिंकला. या रोमहर्षक सामन्यात किवी संघाला शेवटच्या 3 चेंडूंवर 9 धावांची गरज होती. परंतु, मॅक्युलमनं बॅक टू बॅक चौकार मारून भारताच्या तोंडातून विजय हिसकावून घेतला.


दुसरा सामना: भारताचा लाजिरवाणा पराभव (फेब्रुवारी, 2019)
 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फेब्रुवारी 2019 मध्ये वेलिंग्टन येथे दुसरा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं एकतर्फी विजय मिळवला.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात सहा विकेट्स गमावून भारतासमोर 220 धावांचं लक्ष्य ठेवलं.प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या 139 धावांवर सर्वबाद झाला  न्यूझीलंडसाठी 43 चेंडूत 84 धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या किवी फलंदाज टिम सेफर्टला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं.


तिसरा सामना : अनिर्णित (जानेवारी, 2020)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये 31 जानेवारी 2020 रोजी अखेरचा टी-20 सामना खेळला गेला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं न्यूझीलंडसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 19 षटकांत केवळ 3 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या.किवी संघाला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. शार्दुल ठाकूरनं या षटकात केवळ सहा धावा दिल्या. या षटकात  न्यूझीलंडचे दोन खेळाडू झेलबाद तर, दोन धावबाद झाले. अशा प्रकारे सामना बरोबरीत सुटला.


हे देखील वाचा-