पणजी :  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक द्विशतक एका पदकाच्या अंतरावर आहे. ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सोमवारी १२व्या दिवशी प्रामुख्याने तिरंदाजी, योगासने, नौकानयन या क्रीडा प्रकारांत पदके मिळवत पदकांचा आकडा १९९पर्यंत उंचावला आहे. त्यामुळे मंगळवारी महाराष्ट्राचे द्विशतक दृष्टीपथास आहे. पदकतालिकेत अग्रस्थानावर असलेल्या महाराष्ट्राच्या खात्यावर ६८ सुवर्ण, ६३ रौप्य, ६८ कांस्यपदकांसह एकूण १९९ पदके आहेत. सेनादल (५४ सुवर्ण, २३ रौप्य, ३२ कांस्य, एकूण १०९ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (५० सुवर्ण, ३७ रौप्य, ५३ कांस्य, एकूण १४० पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत.


रीकर्व्ह तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर महिला संघाने कांस्यपदक प्राप्त केले. ‌नौकानयनमध्ये महाराष्ट्राने एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके पटकावली. कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महाराष्ट्राचा नौकानयनपटू दत्तू भोकनळचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याने रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वतःचे दुसरे रौप्यपदक नोंदवले. महिलांमध्ये पुण्याची खेळाडू निकिता दरेकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या महिला संघाने अखेरच्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशवर ३२-२२ असा विजय मिळवला. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने चंडीगढचा ४२-१८ असा धुव्वा उडवला आणि गटविजेत्याच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. यश गौडने एकतर्फी विजय साजरा करत महाराष्ट्र संघाचे पदक निश्चित केले. नेमबाजीमधील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला.


तिरंदाजी - रीकर्व्हमध्ये पुरुष संघाला सोनेरी यश; महिला संघाला कांस्यपदक


महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सोमवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील रीकर्व्ह तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर महिला संघाने कांस्यपदक प्राप्त केले. पुरुष गटाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात महाराष्ट्राने झारखंडवर ६-२ असा शानदार विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघात सुमेध मोहोड, सुखमणी बाबरेकर, यशदीप भोगे, गौरव लांबे यांचा समावेश होता. महिला गटाच्या कांस्यपदकाच्या रोमहर्षक सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडूवर ५-४ असा निसटता विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघात मंजिरी अलोने,शर्वरी शेंडे, श्रुष्टी जोगदंड, नक्षत्रा खोडे यांचा समावेश होता. हरयाणाला सुवर्ण आणि झारखंडने कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली.

योगासने - महाराष्ट्राच्या कल्याणीला रौप्य, छकुलीला कांस्यपदक

महाराष्ट्राच्या कल्याणी चुटे व छकुली सेलोकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवत योगासनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वरिष्ठ गटात पारंपरिक योगासनाच्या विभागात हे यश मिळाले.  या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना दोन अनिवार्य आसने करावी लागतात. त्यासाठी प्रत्येकी १५ सेकंदांचा वेळ दिलेला असतो. त्यानंतर आणखी पाच ऐच्छिक आसने करावयाची असतात. त्यासाठी प्रत्येकी १५ सेकंदांचा वेळ दिलेला असतो. २३ वर्षांच्या कल्याणीने गतवर्षी दोन सुवर्णपदके जिंकली होती. ती नागपूर येथे कला शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे. नागपूरचीच खेळाडू असलेली छकुली ही भगवती प्रियदर्शनी महाविद्यालयात बी. टेक. करीत आहे. २० वर्षीय छकुलीला गतवर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळाली होती. या दोन्ही खेळाडू अमित स्पोर्ट्स अकादमी येथे संदेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहेत.


दत्तू भोकनळचे सुवर्णपदक हुकले; निकिता दरेकरला कांस्यपदक
शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या नौकानयनच्या कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महाराष्ट्राचा नौकानयनपटू दत्तू भोकनळचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याने रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वतःचे दुसरे रौप्यपदक नोंदवले. महिलांमध्ये पुण्याची खेळाडू निकिता दरेकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ‌नौकानयनमध्ये सोमवारी महाराष्ट्राने एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके पटकावली.  कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत खेळाडूंना धावत जाऊन वजनाने जाड असलेल्या बोटीमध्ये बसत समुद्रात ५०० मीटर नौकानयन करायचे असते. ही शर्यत दत्तूने २ मिनिटे, ३३.६ सेकंदांत पार केली तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या सेनादलाच्या सलमान खानने हे अंतर २ मिनिटे, ३३.५ सेकंदांत पार केले.‌ दत्तूने याआधी या स्पर्धेतील नदीत झालेल्या सिंगल्स स्कल विभागात रौप्यपदक मिळवले होते.‌ आतापर्यंत त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात ११ सुवर्ण व २ रौप्य अशी १३ पदके जिंकली आहेत. 


दत्तूने नाशिक येथे अयोध्या नौकानयन क्लब हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून साधारणपणे त्याच्याकडे १५ ते २० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. या खेळाडूंनी आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये तीन डझनपेक्षा जास्त पदके जिंकली आहेत.  कोस्टल सिंगल स्कल शर्यतीत महिलांच्या विभागात निकिताने कांस्यपदक मिळवताना ३ मिनिटे, ६.८ सेकंद वेळ नोंदवली. दीड महिन्यापूर्वी तिच्या गुडघ्यातील स्नायूंना दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही, तरीही तिने आज निश्चयाने या स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची नोंद केली. गतवर्षी तिने श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच इनडोअर शर्यतीत कास्यपदक पटकाविले होते. ती सुरुवातीला कबड्डी खेळत असे. चार वर्षांपूर्वी तिने नौकानयनचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती पुण्यात सीएमई येथे सराव करीत असून ओम साई फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेत वाणिज्य शाखेत शिकत आहे.


नेमबाजी -स्वप्नील कुसळे अंतिम फेरी गाठण्यात अपयशी


नेमबाजीमधील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या नेमबाजांची पदकांची पाटी अद्याप कोरी आहे. या गटाच्या अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या आठ नेमबाजांपैकी अखेरच्या खेळाडूने ५८४ गुण पात्रता फेरीत मिळवले. स्वप्नीलने ५८० गुण मिळवले. यापैकी निलिंगमध्ये १९४, प्रोनमध्ये १९७ आणि स्टँडिंगमध्ये १८९ गुण कमावले. वेदांत वाघमारेने ५७९ गुण (निलिंग १९१, प्रोनमध्ये १९६ आणि स्टँडिंगमध्ये १९२ गुण) मिळवले. 
कबड्डी - महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान संपुष्टात; अखेरच्या सामन्यात उत्तर प्रदेशवर विजय


महाराष्ट्राच्या महिला संघाने सोमवारी अखेरच्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशवर ३२-२२ असा विजय मिळवला. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डी संघाचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राने पहिल्या लढतीत हिमाचल प्रदेशकडून पराभव पत्करला. मग दुसऱ्या सामन्यात राजस्थानशी बरोबरी झाली. तीच महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरली. ब-गटातून हिमाचल प्रदेश आणि राजस्थानने उपांत्य फेरीत आगेकूच केली.  अपेक्षा टाकळेचा अपेक्षेनुसार बहरलेला चढायांचा खेळ, त्याला युवा चढाईपटू हरजित कौरच्या धडाकेबाज चढायांची लाभलेली साथ आणि अंकिता जगतापच्या दिमाखदार पकडी या बळावर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या महिला संघाला प्रारंभीची तीन मिनिटे उत्तर प्रदेशने चांगली लढत दिली. पण हरजीत आणि अपेक्षा यांनी गुणांचा सपाटा लावल्यामुळे उत्तरेचा बचाव निरुत्तर झाला. ११व्या मिनिटाला महाराष्ट्राने पहिला लोण चढवला. त्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस महाराष्ट्राकडे २१-१२ अशी भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सत्रातही महाराष्ट्राने सामन्यावरील पकड सुटू दिली नाही. महाराष्ट्राची चढाईपटू सलोनी गजमलच्या या सामन्यात पाच पकडी झाल्या.


पुरुष संघ उपांत्य फेरीत; चंडीगढचा धुव्वा
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अखेरच्या साखळी लढतीत चंडीगढचा ४२-१८ असा धुव्वा उडवला. पंजाब, तामिळनाडू यांना पहिल्या दोन सामन्यांत हरवणाऱ्या महाराष्ट्राने तीन विजयांसह गटविजेत्याच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राचा मंगळवारी उपांत्य सामना हरयाणा संघाशी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आकाश शिंदे आणि तेजस पाटीलच्या बहारदार चढाया तसेच शंकर गदई आणि अक्षय भोईरच्या प्रेक्षणीय पकडींनी महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. महाराष्ट्राने आठव्या मिनिटाला पहिला लोण चढवत चंडीगढवर दडपण आणले. मग सामना संपेपर्यंत महाराष्ट्राचेच वर्चस्व दिसून आले. मध्यंतराला महाराष्ट्राकडे २५-१० अशी आघाडी होती. त्यामुळे दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने अन्य काही खेळाडूंनाही संधी दिली. पण चंडीगढचा खेळ दुसऱ्या सत्रातही उंचावला नाही. 
 


बॉक्सिंग - यश गौड उपांत्य फेरीत; महाराष्ट्राचे दुसरे पदक निश्चित
 मोठ्या भावाच्याच पद्धतीने विजयाचा कित्ता गिरवत युवा यश गौडने एकतर्फी विजय साजरा करत महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक निश्चित केले. 
सोमवारी ६० ते ६३.५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पुण्याच्या यशने पंजाबच्या आसुतोष कुमारवर ५-० असा दणदणीत विजय संपादन केला. त्याचा मोठा भाऊ ऋषिकेश गौडने रविवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ पदक जिंकू शकतील. यादरम्यान संघाच्या राहिल सिद्धिकला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने गोव्याच्या रजत कुमारकडून  पराभव पत्करला.   


महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक


 
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. मंगळवारी उपांत्य सामन्यात महाराष्ट्र महिला संघाची उपांत्य फेरीत ब-गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कर्नाटकशी गाठ पडणार आहे. फोंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटातील तीन्ही सामने जिंकत महाराष्ट्र महिला संघाने गटात अव्वल स्थान कायम राखले.  महिला गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ४८-२४ असा २४ गुणांनी पराभव करत गटात प्रथम स्थान राखले. महाराष्ट्राकडून प्रियांका भोपिने ३.४० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. पूजा फरगडेने आक्रमणाची चमक दाखवत १० गुण मिळवले. किरण शिंदेने २.३० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. संपदा मोरेने २.०० मि. संरक्षण करत ६ गुण मिळवले. गुजरात संघाकडून किरण १.२० मि. आणि १.१० मि. संरक्षण केले. तर गोपीने १.३०, १.२० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि ब गटात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या ओडीसाचा अ गटात दुसऱ्या क्रमांकावरील केरळ बरोबर उपांत्य फेरीचे सामने होणार आहे. आज झालेल्या महिला गटातील अन्य सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा ५२-४० असा २२ गुणांनी तर केरळने गोव्याचा १२०-१२ असा १०८ गुणांनी पराभव केला.


पुरुष गटात महाराष्ट्राने शेवटच्या साखळी सामन्यात आंध्र प्रदेशवर ७४-३२ असा ४२ गुणांनी सहज विजय मिळवला असला तरी सामन्याला प्रारंभ जोशात झाला. प्रथम आक्रमण करणाऱ्या आंध्र प्रदेशने १६ मिळवण्यात यश मिळवले. यामुळे सामना चुरशीचा होईल असे वाटत होते. मात्र महाराष्ट्रने धारदार आक्रमण करीत आंध्रचे २६ गुणांची कमाई करताना सामना एकतर्फी केला. फैजन पठाणने १.१० मि. संरक्षण करत १६ गुणांची नोंद केली, त्याला साथ देत रामजी कश्यपने १.१०, १.०५ मि. संरक्षण करताना १२ गुण मिळवले. ऋषिकेश मुरचवडेने ८ गुण मिळवले तर अक्षय मासाळने १.२० मि. संरक्षण करताना ६ गुण वसूल केले. आंध्र प्रदेशकडून पी. नरसय्याने १.०० मि. संरक्षण करीत ६ गुण मिळवले. सिवा रेड्डीने १.२० मि. संरक्षणचा खेळ करत आक्रमणात ६ गुण मिळवले.


महाराष्ट्राची पदके - दिनांक ६ नोव्हेंबर
नौकानयन
दत्तू भोकनळ - रौप्यपदक
निकिता दरेकर - कांस्यपदक


योगासने
कल्याणी चुटे – रौप्यपदक
छकुली सेलोकर – कांस्यपदक


तिरंदाजी
रीकर्व्ह पुरुष संघ – सुवर्णपदक
रीकर्व्ह महिला संघ – कांस्यपदक
 
एकूण पदके
सुवर्ण : ६८
रौप्य : ६३
कांस्य : ६८
एकूण : १९९