ENG vs SA 2nd Test: तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर (South Africa tour of England) गेलाय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. तर, दुसरा सामना मँचेस्टरच्या (Manchester) एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड (Emirates Old Trafford) येथे सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 151 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या दिवशीच 415 धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि यष्टिरक्षक बेन फोक्सनंही (Ben Foakes) शतक झळकावलं. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या. सरेल एरव्ही कर्णधार डीन एल्गरसह क्रीजवर उपस्थित आहे.


या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 151 धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं पहिल्याच दिवशी 3 विकेट्स गमावून 111 धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो (49 धावा) आणि जॅक क्रॉली (38 धावा) ही जोडी 36 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्सला फोक्सची साथ लाभली. दोघांनी सहाव्या विकेट्ससाठी 173 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. यादरम्यान, बेन स्टोक्सनं कर्णधार म्हणून पहिलं शतक झळकावलं. ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 103 धावा केल्या. त्याच्यानंतर फोक्सही चांगली फलंदाजी करत त्याच्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक ठोकलं.


नॉर्खियाची दमदार गोलंदाजी
इंग्लंडचा संघ 320 धावांवर असताना रबाडानं बेन स्टोक्सच्या रुपात यजमानांना सहावा धक्का दिला. त्यानंतर फोक्सनं संघाची धावसंख्या 400 पर्यंत नेली. फोक्स शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 217 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीनं 113 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्खियानं तीन तर, रबाडा आणि महाराज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.


दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात
दुसऱ्या दिवशीच्या उर्वरित 9 षटकांचा खेळ शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात आला. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या. एल्गर (नाबाद, 11 धावा) आणि सारेल (नाबाद, 12 धावा) करून क्रीजवर उपस्थित आहे.


हे देखील वाचा-